चिट्टी लिहून वृद्धाची आत्महत्या : पोखरापूरचे तीन शेतकरी निर्दोष
सोलापूर दि:- महादेव लक्ष्मण वाघमारे वय 52 रा:- पोखरापूर,ता.मोहोळ, जि. सोलापूर यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अरुण रामचंद्र केवळे,वय 70 बाळासाहेब अरुण केवळे,वय 44 पांडुरंग अरुण केवळे, वय 43 सर्व रा:- पोखरापूर ता मोहोळ जि सोलापूर यांचे वर भरलेले खटल्याची सुनावणी एस.आर. शिंदे यांचेसमोर होऊन त्यांनी गुन्हा शाबीत न झाल्याने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
या हकीकत अशी की, यातील आरोपी व मयत महादेव यांच्या जमीनी शेजारी-शेजारी होत्या व शेतीच्या वहिवाटीवरून गेली 30 ते 32 वर्षापासून त्याच्यामध्ये वाद होत होता. दि:-5/12/2019 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास मयत महादेव व आरोपींमध्ये बाचाबाची झाली होती, त्यावेळी मयत हा घाबरलेल्या अवस्थेत होता. त्यावेळी मयताचा मुलगा व त्याच्या पत्नीने धीर दिला व रात्री सर्वजण झोपी गेले दुसऱ्या दिवशी मयताचा मुलगा हा पहाटे उठला असता मयत महादेव याने घरासमोरील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले व त्याच्या खिशात चिट्टी मिळून आली त्यात अरुण केवळे, बाळासाहेब केवळे, पांडुरंग केवळे यांच्या भयंकर त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याबाबतचे नमूद केले होते. त्यावरून मयत महादेव याचा मुलगा महेश याने मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
सदर गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी आरोपींविरुद्ध दोषारोप पत्रक दाखल केले होते.
सदर खटल्यात सरकारतर्फे एकंदर 8 साक्षीदार तपासण्यात आले.
खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस ऍड मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तिवादात, चिठ्ठीतील अक्षर हे मयताचेच अक्षर असल्याचा पुरावा संशयास्पद वाटतो असा युक्तिवाद मांडला, त्यावरून न्यायाधीशांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
यात आरोपीतर्फे ऍड मिलिंद थोबडे, ऍड विनोद सूर्यवंशी, ऍड. दत्ता गुंड यांनी तर सरकारतर्फे ऍड.दत्तूसिंग पवार यांनी काम पाहिले.