समता सैनिक दलाचा धम्म संस्कार सोहळा संपन्न…

संपत्तीवर नाही, तर विचारांवर वारसा सांगणारी पिढी निर्माण झाली पाहिजे – समादेशक डॉ. दिपाली काळे…
सोलापूर प्रतिनिधी : आई-वडिलांच्या, नातेवाईकांच्या संपत्तीवर नाही, तर त्यांच्या विचारांवर आणि महामानवांच्या विचारांवर वारसा सांगणारी पिढी निर्माण झाली पाहिजे. अशी पिढी निर्माण करण्याचे महनीय कार्य फुले-आंबेडकरवादी आणि बौद्ध अनुयायांनी करावे, असे आवाहन राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहाच्या समादेशक डॉ. दिपाली काळे यांनी केले.
सतराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सायंकाळी नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर समता सैनिक दलाच्या वतीने आयोजित धम्म संस्कार सोहळ्याप्रसंगी त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. यावेळी भदंत सुमेध नागसेन मंचावर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. काळे म्हणाल्या की, आपल्या देशात भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची क्रांती निर्माण झाली पाहिजे. प्रज्ञा, शील, करुणा आणि विवेक हे प्रत्येकांच्या आचरणात आले, तर पोलिसांचे कामच उरणार नाही. माणसाने माणसाशी माणसासारखे वागण्यासाठी जे जे आवश्यक आहे, ते ते सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानवजातीला दिलेले आहे, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी बोलताना भदंत सुमेध नागसेन महाथेरो म्हणाले की, एकदा का शुद्ध आचरण आणि संस्कार अंगी बाणवले, की ते मरेपर्यंत विसरणार नाहीत. हीच तथागत भगवान गौतम बुद्धांची शिकवण आहे. राजा आणि हत्तीचे उदाहरण देऊन त्यांनी संस्कार, शिस्त आणि वळण यांचा दाखला दिला.
डॉ. दिपाली काळे यांच्या हस्ते दिवंगत पीएसआय केरू रामचंद्र जाधव यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. सन्मानचिन्ह, शाल आणि वृक्षाचे रोपटे असे पुरस्काराचे स्वरूप होते.
सुरुवातीस समता सैनिक दलाच्या वतीने भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली. डॉ. दिपाली काळे यांनी समता सैनिक दलाच्या संचालनाचे निरीक्षण केले. धम्म संस्कार सोहळ्याप्रसंगी बालकलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला.
धम्म संस्कार सोहळ्याचे भारदस्त सूत्रसंचालन मुख्याध्यापक वशिष्ठ सोनकांबळे यांनी केले. प्रास्ताविक जीओसी शांतीकुमार कांबळे यांनी केले, तर समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी सर्वांचे आभार मानले.
दिवसभराच्या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बाळासाहेब भोसले बाळासाहेब मस्के(महासचिव), अनिल जगझाप(कार्याध्यक्ष) ,विनोद जाधव, चंद्रकांत कोळेकर, सुनील डांगे, सुमित्रा जाधव, सुनीता गायकवाड, संभाजी तळभंडारे, मुकुंद चंदनशिवे, प्रमोद जाधव, वर्षा जाधव, प्रीती जाधव , रत्नदीप कांबळे, भारत आवारे, ज्ञानेश्वर प्रक्षाले, इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले.
यांचा झाला सन्मान
– डॉ. दिपाली काळे – गुणवंत महिला पोलीस अधिकारी पुरस्कार
– दत्ता गायकवाड – विशेष जीवन गौरव पुरस्कार
– अशोक जानराव– कामगार मित्र पुरस्कार
– सुनील डांगे – बौद्ध धम्म मित्र पुरस्कार
– नागसेन माने – बौद्ध धम्म मित्र पुरस्कार
– विजय गायकवाड – गुणवंत पत्रकार पुरस्कार
– रत्नदीप कांबळे – सहकार भूषण पुरस्कार
– सुचित्रा थोरे – आदर्श धम्मकार्य पुरस्कार
– मंजुश्री खंडागळे – गुणवंत शिक्षिका पुरस्कार



