सोलापुरात ३ वर्षांपूर्वीच्या चोरीचा छडा; १०.९६ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त…!

सोलापूर : शहर गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल तीन वर्षांपूर्वी घडलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत एका संशयिताला अटक केली आहे. त्याच्याकडून १० लाख ९६ हजार रुपये किमतीचे ९ तोळे ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
दि. २७ जानेवारी २०२४ रोजी रात्री १० ते १५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९ वाजेदरम्यान मुमताज नगर, सोलापूर येथील एका घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून कपाटातील लॉकरमधून सुमारे ९६ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी या गुन्ह्याचा तपास करत होते. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना संशयिताचे नाव इस्म नावेद रमजान शेख (वय २६, रा. घर नं. १, मशीदजवळ, मुमताज नगर, सोलापूर) असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेले सुमारे १० लाख ९६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.
गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मनोज मोरे व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदारांनी गोपनीय माहितीच्या आधारे मागील तीन वर्षांपासून उघडकीस न आलेल्या गुन्ह्याचा तपास करून छडा लावला.
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस उपनिरीक्षक मनोज मोरे व त्यांच्या पथकाने केली.



