सोलापूर : सार्वजनिक मिरवणुकीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे चिथावणीखोर वक्तव्य करणे, अवैध जुगार चालवून त्यावर मिळालेल्या उत्पन्नातून दहशत निर्माण करणे यासारखे गुन्हे दाखल असलेल्या प्रसाद उर्फ प्रशांत महादेव लोंढे (वय-३३ वर्षे) सोलापूर जिल्हा व धाराशीव जिल्हा येथून ०२ वर्षाकरीता शुक्रवारी, २२ मार्चपासून तडीपार केले आहे. त्यास तडीपार केल्यानंतर हडपसर, पुणे येथे सोडण्यात आले आहे.
प्रसाद उर्फ प्रशांत महादेव लोंढे (रा. ११७, अवंती नगर फेज-०१, जुना पुना नाका, सध्या सैफुल, विजापूर रोड, सोलापूर) याच्याविरुध्द २००९ ते २०२३ या कालावधीमध्ये, गैरकायद्याची मंडळी जमा करुन दंगा करणे, जनतेच्या मालमत्तेचे नुकसान करणे, सरकारी नोकरांचे कामात अडथळा निर्माण करणे, सरकारी आदेशांचे उल्लंघन करणे अशा स्वरुपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे.
त्याच्याविरुध्द विजापूर नाका पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता. त्या प्रस्तावाचे अनुषंगाने पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ, सोलापूर शहर) विजय कबाडे यांनी कार्यवाही करुन २१ मार्च रोजी प्रसाद उर्फ प्रशांत महादेव लोंढे याला ०२ जिल्ह्यातून ०२ वर्षांकरिता तडीपार करण्यात आल्याचे पोलीस उप आयुक्त परिमंडळ कार्यालय (सोलापूर शहर) पोउपनि वाचक अधिकारी एन. एस. कानडे यांनी सांगितलंय.