विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया…
मंत्री मंगल प्रभात लोढा आणि नरेंद्राचार्य महाराजांच्या अनुयायांनी केली तक्रार, माफीची मागणी....

२४ फेब्रुवारी, मुंबई : जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरल्याने काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. नरेंद्राचार्य महाराज यांच्या अनुयायांच्या भावना दुखावल्याने, आज मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत अनुयायांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून तक्रार दिली. पुढे यासंदर्भात पोलिसातही तक्रार दाखल केली जाणार असल्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. तसेच, विजय वडेट्टीवार यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी अनुयायांनी केली आहे.
यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, “विजय वडेट्टीवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हिंदू धर्म, श्रद्धा आणि गुरुंबद्दल अपमानास्पद भाषा वापरण्याची जुनी सवय आहे. परंतु यावेळी केलेले विधान अक्षम्य असून, संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. मी विजय वडेट्टीवार यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही. आता मी त्यांना प्रत्यक्ष भेटून माफी मागण्यास सांगणार आहे. नरेंद्राचार्य महाराजांनी हिंदू धर्मासाठी आणि समाजासाठी मोठे कार्य केले आहे. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून देशात आणि परदेशात केलेल्या लोकसेवेबद्दल कदाचित विजय वडेट्टीवार यांना माहिती नसेल!”



