सोलापूर बातमीमहाराष्ट्रशैक्षणिक

जिनधर्म संस्कार शिबिरातून अध्यात्मिक जागृतीचा संदेश…

सोलापूरच्या धार्मिक व शैक्षणिक परंपरेत महत्त्वपूर्ण स्थान असलेल्या डब्ल्यू. आय. टी. जैन टेम्पल येथे यंदाचे “श्री जिनधर्म संस्कार शिबिर” उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात सुरू झाले आहे. दरवर्षीप्रमाणे आयोजित केले जाणारे हे शिबिर यंदा २४ ते २८ एप्रिल दरम्यान पार पडत असून, ८ ते २५ वर्षे वयोगटातील जैन मुला-मुलींसाठी अध्यात्मिक संस्कारांची अनमोल शिदोरी ठरत आहे.

परमपूज्य १०८ निर्यापक मुनी श्री वीरसागर महाराज व समस्त मुनीसंघ यांच्या पावन मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या शिबिरात जैन धर्माच्या तत्त्वज्ञानाची सखोल ओळख करून देण्यात येत आहे. पूज्य गुरुवर्यांच्या उपस्थितीमुळे शिबिरार्थींना केवळ सैद्धांतिक नव्हे, तर आचरणात्मक धर्मशिक्षणाचा अनुभव मिळत आहे.

शिबिराची सुरुवात प्रातःकाळी शांत, साधनामय वातावरणात होत असून पूजा, अष्टद्रव्य विधी, णमोकार मंत्र, पाच पाप, तसेच लोकाकाश-अलोकाकाश यांसारख्या जैन तत्त्वज्ञानातील गूढ संकल्पनांचे सुलभ मार्गदर्शन केले जात आहे.

विद्यार्थ्यांना आकर्षक चित्रांसह सुसज्ज ‘थ्री लोक एक्सप्लोरर’ स्वरूपातील अभ्यासपुस्तिका प्रदान करण्यात आल्यामुळे त्यांची जिज्ञासा अधिक वृद्धिंगत होत आहे.

परमपूज्य मुनी श्री वीरसागर महाराज यांनी णमोकार महामंत्राच्या उच्चारणातील शुद्धता, एकाग्रता आणि अंतर्मुखतेवर विशेष भर दिला. “मंत्र म्हणताना दृष्टी, श्वास आणि मन यांचे संयमन साधले, तर आत्मशुद्धीचा मार्ग सुकर होतो,” असा संदेश त्यांनी दिला. त्यांनी ‘नसाग्र दृष्टी’ ठेवून शांतचित्ताने मंत्रसाधना करण्याचे प्रात्यक्षिक दाखवत विद्यार्थ्यांना आत्मअनुशासनाचे महत्त्व पटवून दिले.

तसेच परमपूज्य १०८ श्री विशालसागर महाराज यांनी अभिषेक विधी, देवदर्शनाची शास्त्रशुद्ध पद्धत आणि स्तुतीपठण यांचे मार्गदर्शन करत श्रद्धेला विवेकाची जोड देण्याचा संदेश दिला. मंत्रोच्चार करताना शरीराची स्थिती, हातांची मुद्रा आणि भावमुद्रा कशी असावी, याचे प्रत्यक्ष प्रशिक्षणही शिबिरार्थींना देण्यात आले.
या शिबिरातून ‘पंच परमेष्ठी’ अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय आणि साधू यांविषयी विनयभाव जागृत करत नमोकार मंत्राचे गूढ अर्थ स्पष्ट करण्यात आले. जैन तत्त्वज्ञानातील चार गती देव, मनुष्य, तिर्यंच आणि नरक यांचे विवेचन करून कर्मसिद्धांताचा गाभा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.
शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मपरीक्षणाची सवय रुजविण्यासाठी विविध प्रश्नावली देण्यात आली आहे. इंद्रियांच्या माध्यमातून आपण कोणत्या चांगल्या व वाईट गोष्टी अनुभवतो, याचा विचार करून स्वभावपरिवर्तनाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel