सोलापुरात १७ सप्टेंबरला राज्यस्तरीय ‘चालक रत्न पुरस्कार सोहळा’..!

सोलापूर : १७ सप्टेंबर हा चालक दिन म्हणून साजरा केला जातो. चालकांच्या कर्तृत्वाचा, प्रामाणिक सेवेचा आणि सामाजिक योगदानाचा गौरव करण्यासाठी वाहतूक संघटना संयुक्त महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय ‘चालक रत्न पुरस्कार सोहळा २०२६’ आयोजित करण्यात आला आहे.
या पुरस्कार सोहळ्याचे हे पाचवे वर्ष असून, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून उत्कृष्ट व गुणवंत चालक सोलापुरात उपस्थित राहणार आहेत. चालक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या चालकांचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
गुरुवार, १७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता, बेरिया फंक्शन हॉल, सोलापूर क्लबजवळ, सोलापूर येथे हा सोहळा पार पडणार आहे.
चालक हा केवळ वाहन चालविणारा व्यक्ती नसून प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेणारा, कुटुंबाचा आधारस्तंभ आणि समाजाच्या गतिमानतेतील महत्त्वाचा घटक आहे. दिवस-रात्र, ऊन-पाऊस आणि अनेक अडचणींवर मात करत कर्तव्य बजावणाऱ्या चालकांना समाजात सन्मानाचे स्थान मिळावे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे संघटनेने सांगितले.
या सोहळ्यात चालकांच्या विविध समस्या, हक्क व कल्याणाच्या प्रश्नांवरही चर्चा करण्यात येणार आहे. तसेच चालकांच्या हितासाठी संघटनेचा संघर्ष आणि सामाजिक कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा निर्धार करण्यात येणार आहे.
‘चालकांचा सन्मान म्हणजे समाजाच्या सेवकांचा सन्मान’ या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व चालक बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वाहतूक संघटना संयुक्त महासंघ, महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रियाज भाई सय्यद यांनी केले आहे



