महाराष्ट्रsolapurpoliceक्राईमसोलापूर बातमी

गणेशोत्सवाच्या आनंदावर काळाचा घाला: बेळगावात फ्रीजच्या स्फोटाने लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा दुर्दैवी अंत..!

बेळगाव: श्री गणरायाच्या आगमनाने सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पसरलेले असतानाच बेळगावात एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सोमवारी रात्री घरातील रेफ्रिजरेटरचा भीषण स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत एकाच घरातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. अवघ्या काही मिनिटांतच आगीच्या ज्वालांनी संपूर्ण घराला कवेत घेतल्याने कुटुंबातील सदस्यांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.

सोमवारी सकाळीच या कुटुंबाने मोठ्या श्रद्धेने गणपती बाप्पाची मूर्ती आणून तिची स्थापना केली होती. मात्र, त्याच रात्री काळाने त्यांच्यावर झडप घातली. बेळगाव येथील मध्यवर्ती बस स्थानकाजवळ असलेल्या चावत गल्लीत ही दुर्दैवी दुर्घटना घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे.

आगीत चौघांचा मृत्यू, दोघींची प्रकृती चिंताजनक या भीषण अपघातात गजानन दामोने (वय ६५), शारदा दामोने (वय ४५), भारती दामोने (वय ५०) आणि रोशन दामोने (वय २१) यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रिया दामोने (वय २८) आणि गंगा दामोने (वय २४) या गंभीररीत्या भाजल्या असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांचीही प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

शॉर्ट सर्किटमुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज हे घर पत्र्याच्या छताचे असून त्यात एकाच कुटुंबातील सहा जण राहत होते. मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. रेफ्रिजरेटरमध्ये नेमका कशामुळे स्फोट झाला याचा तपास पोलीस करत असले, तरी प्राथमिक पाहणीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

गणपती मंडपाची राखरांगोळी; बाप्पाचे विसर्जन आगीची तीव्रता एवढी प्रचंड होती की, फ्रीजचा जळून पूर्णपणे कोळसा झाला आहे. या आगीत घरात सजवलेला गणपतीचा देखावा आणि मंडपही खाक झाला. कौटुंबिक आपत्तीनंतर अत्यंत दुःखी वातावरणात बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, घरातील चार महिला रात्री फ्रीजच्या अगदी जवळ झोपल्या होत्या. त्यामुळे स्फोट होताच त्या आगीच्या तावडीत सापडल्या आणि त्यांचा अत्यंत वेदनादायक अंत झाला. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या भीषण घटनेने स्थानिक नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel