अक्कलकोटचे आमदार सचिन दादा यांच्या हत्येचे कट; तीव्र निषेध – किसन जाधव..!

अक्कलकोटचे विद्यमान आमदार मा. श्री. सचिनदादा कल्याणशेट्टी यांना गोळ्या घालून ठार मारण्यासाठी त्यांच्या चालकाला पैशांचे आमिष दाखविण्याचा धक्कादायक प्रकार समोर येणे, ही अत्यंत गंभीर आणि संतापजनक बाब आहे.
हा केवळ एका आमदाराच्या जीवाला धोका देण्याचा प्रयत्न नाही, तर लोकशाहीच्या मुळावर घाव घालण्याचा आणि कायदा – सुव्यवस्थेला खुले आव्हान देण्याचा प्रकार आहे! असल्याचे प्रतिपादन सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक किसान जाधव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे.
राजकारणात मतभेद असू शकतात, वैचारिक संघर्ष असू शकतो; मात्र एखाद्या लोकप्रतिनिधीचा जीव घेण्याचा कट हा कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाऊ शकत नाही. अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचून काढणे ही काळाची गरज आहे.
या घृणास्पद कटामागे नेमके कोण आहेत? कोणाचा हात आहे? कोणाचे पाठबळ आहे? आणि या कटाचा खरा सूत्रधार कोण आहे? या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर जनतेसमोर आलेच पाहिजे!
तपास केवळ वरवरचा नको; कटाच्या मुळापर्यंत जाऊन प्रत्येक आरोपी आणि सूत्रधाराचा पर्दाफाश झाला पाहिजे. कोणाचाही दबाव, राजकीय हस्तक्षेप किंवा प्रतिष्ठा आडवी येता कामा नये. दोषी कितीही मोठा असो – कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही!
महाराष्ट्राचे दमदार मुख्यमंत्री तथा गृहमंत्री नामदार श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास होईल आणि या कटाच्या मुळापर्यंत जाऊन दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.
या कृत्यामागील प्रत्येक आरोपीला लवकरात लवकर कायद्याच्या बेड्या ठोकून, अशा नीच प्रवृत्तीचे कृत्य करण्याचे धाडस यापुढे कोणाच्याही मनात निर्माण होणार नाही, असा कठोर संदेश मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब देतील, याची खात्री आहे.
आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी हे जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही!
हा आवाज केवळ निषेधाचा नाही, तर न्यायासाठीचा आहे!
हा इशारा आहे – लोकशाहीला आणि जनतेच्या प्रतिनिधींना धमकावण्याचे दिवस आता संपले आहेत!
आमदार मा. श्री. सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या पाठीशी संपूर्ण सोलापूर जिल्हा व हजारो कार्यकर्ते खंबीरपणे उभे आहेत!



