सोलापूर शहरातील मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा; व्यापक नसबंदी मोहीम राबविण्याची आयुक्तांकडे मागणी..!

सोलापूर :- शहरातील वाढत्या मोकाट कुत्र्यांच्या संख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा व आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून तातडीने प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते पैलवान माऊली हेगडे यांनी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सोलापूर शहरातील विविध भागांमध्ये मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना सातत्याने घडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.काही दिवसांपूर्वी वाडिया हॉस्पिटल परिसरात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला.या घटनेत त्याच्या मांडीचे लचके तोडण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच एका ज्येष्ठ महिलेलाही हाताला गंभीर दुखापत झाली असून अन्य सात नागरिकांनाही कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रकारांमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लहान मुले,ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
माऊली हेगडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, कोरोना काळात तसेच त्यानंतरच्या कालावधीत महानगरपालिकेकडून मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीची प्रक्रिया अनेक वर्षे रखडली होती. २०२० नंतर काही प्रमाणात नसबंदी करण्यात आली असली तरी त्यामध्ये सातत्य नव्हते आणि नसबंदीची संख्या अत्यंत कमी होती. सध्या वर्षाकाठी केवळ ६०० ते ७०० कुत्र्यांची नसबंदी होत असल्यास ते प्रमाण शहरातील वाढत्या कुत्र्यांच्या संख्येच्या तुलनेत अपुरे असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी दरवर्षी किमान १० हजार कुत्र्यांची शास्त्रशुद्ध पद्धतीने नसबंदी होणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यासाठी नसबंदीचे टेंडर देताना अनुभवी, सक्षम आणि आवश्यक पायाभूत सुविधा असलेल्या संस्थेची निवड करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
सोलापूर शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या मागील काही वर्षांत झपाट्याने वाढली असून २०२६ मध्ये ही संख्या एक लाखांहून अधिक असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे व्यापक नसबंदी मोहीम, रेबीज प्रतिबंधक लसीकरण, कुत्र्यांचे योग्य व्यवस्थापन आणि प्रभावी नियंत्रण उपाययोजना तातडीने राबविण्याची गरज असल्याचे हेगडे यांनी सांगितले.
नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन महानगरपालिकेने या विषयाकडे गांभीर्याने पाहावे आणि मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर तात्काळ ठोस उपाययोजना करून शहरवासीयांना दिलासा द्यावा, अशी मागणी समाजिक कार्यकर्ते पैलवान माऊली हेगडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.



