अक्कलकोट तालुक्याला मिळणार कॅबिनेट मंत्रीपद…?
सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या नावाची जोरदार चर्चा...

राज्यातील आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात एक नाव वेगाने पुढे येताना दिसत आहे,ते म्हणजे अक्कलकोटचे आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी.भाजप संघटनवाढ,निवडणूक व्यवस्थापन,विकासनिधी खेचून आणण्याची क्षमता,स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाचे वर्चस्व निर्माण करण्याचे राजकीय कौशल्य आणि पक्षश्रेष्ठींशी असलेले मजबूत समन्वय या सर्व बाबींमुळे मंत्रीपदासाठी त्यांचे नाव आता गंभीरपणे चर्चेत आले आहे.सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळताना सोलापूर जिल्ह्यात भाजपची ताकद केवळ वाढवली नाही,तर ती प्रत्यक्ष सत्तेत रूपांतरित करून दाखवली.सोलापूर महानगरपालिकेवर पहिल्यांदाच भाजपची एकहाती सत्ता आणण्यात त्यांची रणनीती निर्णायक ठरली.मैंदर्गीत नगर परिषद मध्ये प्रथमच भाजपची सत्ता स्थापन झाली.जिल्हा परिषदेत भाजपला बळ मिळाले.अक्कलकोट पंचायत समितीत स्वबळावर सभापतीपद मिळवून देताना त्यांनी स्थानिक राजकारणात भाजपचा झेंडा उंचावला…
एवढेच नाही तर सोलापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीतही राजकीय चाणाक्षपणे डावपेच रचत आपले वर्चस्व सिद्ध केले.अक्कलकोट तालुक्यापुरते मर्यादित न राहता उत्तर सोलापूर,दक्षिण सोलापूर,मोहोळ आणि जिल्ह्यातील इतर भागातही भाजपची ताकद वाढवण्यासाठी त्यांनी आक्रमक पद्धतीने काम केले.विविध पक्षांतील प्रभावी नेते,माजी आमदार,नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणून संघटन अधिक मजबूत करण्यामागे त्यांचा मोठा वाटा असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते.दिलीप माने,राजन पाटील यांसारख्या नेत्यांना पक्षात घेण्याच्या हालचालीतही त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण मानली जाते.
जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची क्षमता असलेला नेता म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे.विकासकामांच्या बाबतीतही सचिन दादा यांनी आपली वेगळी छाप निर्माण केली आहे.अक्कलकोट तालुका आणि मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात विकासनिधी खेचून आणणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली आहे.केवळ राजकारण न करता विकास,संघटन,निवडणूक जिंकण्याची क्षमता आणि पक्ष विस्तार या चारही आघाड्यांवर त्यांनी सातत्याने काम केल्याने त्यांचे राजकीय वजन मोठ्या प्रमाणात वाढले आहे…
महत्त्वाची बाब म्हणजे पक्षश्रेष्ठींच्या विश्वासातील आमदार म्हणूनही सचिन दादा यांच्याकडे पाहिले जाते.मुख्यमंत्री यांच्याशी असलेला समन्वय,पक्षनिष्ठा,कठीण राजकीय परिस्थितीत संघटना उभी करण्याची ताकद आणि जिल्ह्यातील वाढता प्रभाव या सर्व बाबी पाहता आगामी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान मिळाले तर ते कुणालाही धक्कादायक ठरणार नाही.उलट,त्यांच्या कामाची ती नैसर्गिक पोचपावती मानली जाईल.सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या अनेक नेते सक्रिय असले तरी संघटनकौशल्य,सत्ता मिळवण्याची क्षमता,पक्ष विस्तार आणि विकासाच्या मुद्द्यावर ठसा उमटवणारे नेतृत्व म्हणून सचिन दादा कल्याणशेट्टी यांचे नाव आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
त्यामुळे अक्कलकोट तालुक्याला कॅबिनेट मंत्रीपदाच्या रूपाने मोठा मान मिळणार का,याची उत्सुकता आता कार्यकर्त्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत वाढू लागली आहे.अर्थात,मंत्रिपदाचा अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठींच्या राजकीय गणितावर अवलंबून असतो.मात्र सध्याची परिस्थिती,
जिल्ह्यातील त्यांची कामगिरी आणि पक्षासाठी दिलेले योगदान पाहता सचिन दादा कल्याणशेट्टी यांचे नाव मंत्रीपदासाठी सक्षम दावेदार म्हणून समोर येत आहे.आगामी विस्तारात त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले,तर तो अक्कलकोट तालुक्यासाठी अभिमानाचा आणि सोलापूर जिल्ह्यासाठी राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा क्षण ठरेल…



