शहीदांच्या विचारांची ज्वाला पेटली; सोलापुरात युवा महासंघाची आक्रमक मशाल रॅली…

23 मार्च शहीद भगत सिंग सुखदेव राजगुरू यांच्या स्मृतीदिनानिमित्त भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ, जिल्हा समिती सोलापूरच्या वतीने क्रांतिकारी अभिवादन व आक्रमक मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी युवा महासंघाचे राज्य सचिव दत्ता चव्हाण यांनी सांगितले की, भगतसिंग यांचे साम्राज्यवाद विरोधी विचार हे केवळ ब्रिटिश सत्तेविरुद्ध नव्हते, तर शोषणमुक्त, समताधिष्ठित समाज उभारण्याचे व्यापक स्वप्न होते. आजच्या काळात युद्ध, आर्थिक विषमता आणि मानवी हक्कांवरील हल्ले वाढत असताना हे विचार अधिकच प्रासंगिक ठरत आहेत.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली. जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी व सीटूचे नेते युसुफ शेख मेजर यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करण्यात आली. रॅली सरस्वती चौक, लकी चौक मार्गे चार हुतात्मा पुतळा येथे दाखल झाली. तेथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व चार हुतात्मा यांना पुष्पहार अर्पण करून समारोप करण्यात आला.
यावेळी युवा महासंघाचे केंद्रीय समिती सदस्य ॲड. अनिल वासम यांनी आपल्या भाषणात केंद्र व राज्य सरकारच्या युवक, विद्यार्थी, शिक्षण व रोजगार धोरणांवर तीव्र टीका केली. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, “आज देशातील तरुण बेरोजगारीच्या विळख्यात अडकला आहे. शिक्षणाचे व्यापारीकरण करून सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवले जात आहे. रोजगार निर्मितीच्या नावाखाली केवळ घोषणाबाजी केली जाते, प्रत्यक्षात तरुणांच्या हाताला काम नाही.”
पुढे ते म्हणाले, “भगतसिंगांनी ज्या शोषणमुक्त समाजाचे स्वप्न पाहिले, त्याच्या विरुद्ध आज धोरणे राबवली जात आहेत. युवकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सत्ताधाऱ्यांविरोधात संघर्ष तीव्र करणे ही काळाची गरज आहे. जर सरकारने तात्काळ ठोस पावले उचलली नाहीत, तर रस्त्यावर उतरून व्यापक आंदोलन उभारले जाईल.
युवकांना संबोधित करताना ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांनी युवकांना संबोधित करताना आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी सांगितले, “भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी अन्यायाविरुद्ध लढा देत बलिदान दिले. आज त्या विचारांना केवळ स्मरण करून चालणार नाही, तर ते प्रत्यक्षात उतरवण्याची गरज आहे.” ते पुढे म्हणाले, “देशात वाढती बेरोजगारी, महागाई आणि सामाजिक विषमता ही गंभीर समस्या आहे. या विरोधात युवकांनी संघटित होऊन संघर्ष उभारला पाहिजे. अन्याय सहन करणे हा पर्याय नाही—तर त्याविरुद्ध उभे राहणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल.
कार्यक्रमास अशोक बल्ला ,विल्यम ससाणे, बापू साबळे, मुरलीधर सुंचु, विजय हरसुरे, बालकृष्ण मल्याळ, मधुकर चिल्लाळ, नरेश गुल्लापल्ली, किशोर झेंडेकर,दिनेश बडगु, बजरंग गायकवाड, बालाजी गुंडे, वीरेंद्र पद्मा, दीपक निकंबे, अभिजित निकंबे, अश्विनी मामाड्याल, आप्पाशा चांगले, राहुल बुगले , चंटी बिटला, बालाजी तुम्मा, शिवा श्रीराम,आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.



