डॉ. पानतावणे यांनी आंबेडकरी चळवळ निष्ठेने जोपासली : समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर

महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर आंबेडकरी चळवळ रुजवण्याचे प्रयत्न ज्या विचारवंतांनी केले त्यामध्ये डॉ. गंगाधर पानतावणे यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे त्यांनी आपल्या जीवनभर आंबेडकरी विचाराशी बांधिलकी ठेवून आंबेडकरी चळवळ निष्ठेने जोपासण्याचे कार्य केले. असे विचार समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी मांडले
अस्मितादर्शकार पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे प्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीने आयोजित डॉ. पानतावणे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सभेमध्ये ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. कार्यक्रमास ज्येष्ठ लेखक योगीराज वाघमारे, डॉ. एम. डी. शिंदे, डॉ. डी. आर. गायकवाड, डॉ संघप्रकाश दुड्डे हे मान्यवर उपस्थित होते.
अण्णासाहेब भालशंकर यांनी समकालीन आंबेडकरी चळवळीचा आढावा घेताना त्यामध्ये निर्माण झालेले अवरोध मांडले. मात्र यातून बाहेर पडण्यासाठी डॉ. पानतावणे यांचे विचार व कार्य आदर्श असल्याचे मत त्यांनीव्यक्त केले. पानतावणे यांनी आपल्या आयुष्यात अस्मितादर्शच्या माध्यमातून चळवळ निर्माण केली. लेखकांची नवी पिढी घडवली. विशेषतः आंबेडकरी विचार रुजवण्यासाठी त्यांनी कष्टपूर्वक प्रयत्न केले. त्याचा आदर्श आजच्या पिढीने घेणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी मांडले. ज्येष्ठ लेखक योगीराज वाघमारे यांनी मिलिंद कॉलेजमधील डॉ. पानतावणे यांचे कार्य विशद केले एक उत्तम शिक्षक मार्गदर्शक आणि संपादक असणारे डॉ. पानतावणे यांच्या अनेक आठवणी त्यांनी यानिमित्ताने मांडल्या. दलित साहित्यिकांची एक पिढी घडवण्याचे कार्य पानतावणे यांनी केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. डॉ. संघप्रकाश दुड्डे यांनी डॉ. पानतावणे यांच्या अस्मितादर्श मधील कार्याचा आढावा घेतला. विशेषतः एक संपादक म्हणून अत्यंत तत्परतेने व कार्य कुशलतेने ही चळवळ त्यांनी उभी केल्याचे नमूद केले. डॉ. डी. आर. गायकवाड यांनी डॉ. पानतावणे यांच्या आठवणींना उजाळा दिला. शिवाजी विद्यापीठापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अनेक प्रसंग त्यांनी या ठिकाणी मांडले. डॉ. पानतावणे हे आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ .एम. डी. शिंदे यांनी दलित चळवळ आणि साहित्याचा पाया घालण्याचे कार्य डॉ. पानतावणे यांनी केल्याचे नमूद करताना दलित चळवळीचा क्रांतदर्शी इतिहास मांडला. सुरुवातीच्या काळापासून डॉ. पानतावणे यांनी दलित साहित्याची भूमिका परखडपणे मांडली. हे त्यांचे तत्कालीन कार्य क्रांतिकारक अशा स्वरूपाचे होते. त्यावरतीच ही चळवळ जगभर पसरल्याचे त्यांनी नमूद केले.
सदर कार्यक्रमास नालंदा नगर व सोलापूर मधील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये डॉ. शिवाजी मस्के, डॉ. दादासाहेब खांडेकर, डॉ. बापूराव राऊत, डॉ. सतीश चोपडे, अजीम तळभंडारे, बोधीप्रकाश गायकवाड, जीवक सुरवसे, कवी शेख, लक्ष्मण उपाडे, आम्रपाली गाडे, मंजुश्री खंडागळे, सुप्रिया माने, सिध्दार्थ साबळे, बाबरे यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सारीपुत्र तुपेरे यांनी केले तर आभार कवी चंद्रकांत मागाडे यांनी मानले.



