रे नगर गृहप्रकल्पातील वीज जोडणीचा प्रश्न मार्गी; ५०० रुपयांत जोडणीची हमी, खंडित वीजपुरवठा तात्काळ सुरू करण्याची मागणी…

मौजे कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) येथील रे नगर फेडरेशनच्या वतीने उभारण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३० हजार सदनिकांच्या गृहप्रकल्पात सध्या १५,००४ घरे पूर्ण झाली असून अनेक लाभार्थी वास्तव्यास गेले आहेत.
या प्रकल्पातील लाभार्थ्यांना नवीन वीज जोडणी नाममात्र ५०० रुपयांत देण्याबाबत महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांकडून ६ नोव्हेंबर २०२३ रोजी कार्यालयीन आदेश जारी करण्यात आला होता. त्यानुसार प्रति जोडणी प्रक्रिया शुल्क १२० रुपये, त्यावर १८ टक्के जीएसटी आणि ३८० रुपये सुरक्षा ठेव अशी एकूण ५०० रुपयांची रक्कम निश्चित करण्यात आली होती.
मात्र, अनावधानाने वीज वितरण कंपनीकडून वाढीव दराने वीज जोडणीची मागणी केली जात असल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात शिष्टमंडळाने संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. त्यानंतर लाभार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच ५०० रुपयांत नवीन वीज जोडणी देण्यात येईल, अशी स्पष्ट हमी देण्यात आली.
दरम्यान, रे नगर गृहनिर्माण प्रकल्पातील गट क्रमांक ७६४, ७५५, ७२१, ७२२-२३, ७२६, ६९७ व ७०७ मधील लाभार्थ्यांना घरे हस्तांतरित करण्यात आली आहेत. मात्र, या भागातील वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सदर वीजपुरवठा तात्काळ सुरळीत करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
वीजपुरवठा खंडित राहिल्यामुळे या महत्वाकांक्षी व पथदर्शी रे नगर गृहप्रकल्पात लाभार्थी वास्तव्यास येण्यास टाळाटाळ करत असून, त्याचा प्रतिकूल परिणाम प्रकल्पावर होत आहे. त्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक सेवा तातडीने उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे मत प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक कॉ. नरसय्या आडम मास्तर यांनी व्यक्त केले.
शुक्रवार, दि. १० एप्रिल २०२६ रोजी रे नगर गृहनिर्माण प्रकल्पाच्या वतीने ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांना निवेदन सादर करण्यात आले.
या वेळी शिष्टमंडळात कॉ. युसुफ शेख (मेजर), दाऊद शेख, नरेश दुगाणे, वीरेंद्र पद्मा, पांडुरंग म्हेत्रे आदींचा समावेश होता.



