नगरसेवक वैभव हत्तुरे यांच्या जात वैधता प्रमाणपत्राविरोधातील याचिकेची उच्च न्यायालयात गंभीर दखल ; याचिकाकर्ता नागेश लक्ष्मण ताकमोगे यांना दिलासा

सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेले नगरसेवक वैभव श्रीशैल हत्तुरे यांच्या जात वैधता प्रमाणपत्राला आव्हान देणाऱ्या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने दखल घेतली आहे. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तथा याचिकाकर्ते नागेश लक्ष्मण ताकमोगे यांनी दाखल केलेल्या रिट याचिका क्र. १४२४/२०२६ वर न्यायमूर्ती मिलिंद एन. जाधव आणि नंदेश एस. देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
याचिकेत महाराष्ट्र शासन, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती (सोलापूर), जात पडताळणी व सत्यापन समिती (पुणे विभाग), सोलापूरचे आयुक्त, वैभव श्रीशैल हत्तुरे आणि सोलापूर जिल्हाधिकारी यांना प्रतिसादक करण्यात आले आहे. याचिकेत वैभव श्रीशैल हत्तुरे यांना १८ नोव्हेंबर २०२२ रोजी देण्यात आलेल्या जात वैधता प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आला आहे.
प्राथमिक सुनावणीनंतर न्यायालयाने वैभव श्रीशैल हत्तुरे यांच्यासह सर्व खाजगी प्रतिसादकांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. राज्य शासनाच्या वतीने उपस्थित असलेल्या शासकीय वकिलांनी प्रतिसादक क्रमांक १, २, ३ आणि ६ यांच्या वतीने नोटीस स्वीकारली असून दोन आठवड्यांच्या आत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
तसेच याचिकाकर्ता भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नागेश लक्ष्मण ताकमोगे यांना खाजगी प्रतिसादकांना याचिका व न्यायालयीन आदेशाची प्रत देण्याची परवानगी देण्यात आली असून संबंधित प्रतिसादकांना नोटीस मिळाल्यानंतर दोन आठवड्यांच्या आत आपले म्हणणे प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ जुलै २०२६ रोजी होणार आहे.
भाजपचे उमेदवार नागेश लक्ष्मण ताकमोगे यांच्या याचिकेमुळे नगरसेवक वैभव श्रीशैल हत्तुरे यांच्या पद धोक्यात आले असून ती रद्द झाल्यास सोलापूर महानगरपालिकेची प्रभाग क्रमांक 25 मध्ये पुन्हा एकदा निवडणूक लागणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात व शहरात बोगस जातीचे दाखले काढून लोकप्रतिनिधी झालेल्या व्यक्तींना मोठी चपराक बसणार आहे. कोल्हापूर बेंच हायकोर्टाच्या आदेशाने सोलापूरात खळबळ उडाली आहे.



