सोलापूर विद्यापीठात समतेचा संदेश: १८ तासांचा अखंड वाचन-अभ्यास

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि. ८ ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत विविध सामाजिक, शैक्षणिक आणि प्रबोधनपर उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत आज रविवारी ‘सामाजिक समता सप्ताह’ निमित्त सलग १८ तासांच्या वाचन-अभ्यास उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या उपक्रमात एकूण ११० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला असून ज्ञानार्जनासोबतच सामाजिक बांधिलकीची जाणीव दृढ करण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात येत आहे. विशेष म्हणजे या उपक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या हस्ते झाडाला पाणी देऊन करण्यात आली. ज्ञानासोबत पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करणारा हा उपक्रम सर्वांच्या लक्षात राहणारा ठरला.
या उपक्रमाचे नियोजन ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. अनिल घनवट यांनी केले असून त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची सवय जोपासण्याबरोबरच चिंतनशील दृष्टिकोन विकसित करण्याचे आवाहन केले.
विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, अध्यासन समन्वयक डॉ. गौतम कांबळे तसेच प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहामध्ये विविध व्याख्याने, चर्चासत्रे, वाचन उपक्रम आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समतेची जाणीव अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार आणि सामाजिक समतेचे मूल्य रुजविण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेला हा सप्ताह विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.



