महापौरांच्या प्रभागातच नागरिकांची गैरसोय; दूषित पाण्याने आरोग्याचा धोका वाढला…

सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक १२ मधील आशा नगर परिसरात बुधवारी (१७ जून) सायंकाळी झालेल्या पाणीपुरवठ्यात अत्यंत दूषित स्वरूपाचे पाणी आल्याचा प्रकार समोर आला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार पाण्यामध्ये ऑईलसारखा थर दिसून येत असून गटाराचे पाणी मिसळल्याचा संशय व्यक्त केला जात आहे…
या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. स्वच्छ व निर्मळ पाणीपुरवठ्याच्या घोषणा करणाऱ्या प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे, हा प्रकार महापौरांच्या प्रभागात घडल्याने नागरिकांमध्ये अधिक संताप व्यक्त होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भागाचे नेतृत्व असूनही नागरिकांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम असल्याची टीका होत आहे.
नागरिकांनी महापौरांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवून दूषित पाणीपुरवठ्याची चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
आशा नगरमधील ही घटना केवळ एका भागापुरती मर्यादित नसून संपूर्ण शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रत्येक नागरिकाला सुरक्षित व स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.



