जगातील सर्वात धोकादायक पक्षी, ज्याच्या हल्ल्यात माणूसही मरु शकतो

11 नोव्हेंबर : जगभरात अनेक वेगवेगळे पक्षी, प्राणी, जीव आहेत. प्रत्येकांचं आपलं खास असं वैशिष्ट्य आहे. असेही अनेक जीव आहेत ज्यांच्याविषयी बहुतेक लोकांना माहितही नसतं. अशाच एका पक्ष्याविषयी आपण जाणून घेणार आहोत जो दिसायला सुंदर वाटतो पण प्रत्यक्षात घातक आहे.
त्याच्या हल्ल्यात माणसांचाही जीव जाऊ शकतो. हा पक्षी नेमका कोणता आहे आणि तो कुठे आढळतो याविषयी जाणून घेऊया.
ज्याच्या हल्ल्यात एखाद्याचा जीव जाऊ शकतो, अशा घातक पक्ष्यांचं नाव आहे ‘कॅसोवरी’. या पक्ष्याला जगातील सर्वात धोकादायक पक्षी मानलं जातं. या पक्ष्यानं एका व्यक्तीवर हल्ला केला होता आणि तो मरण पावला. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अहवालानुसार कॅसोवरी हा पक्षी जगातील सर्वात धोकादायक आहे. 12 एप्रिल 2019 रोजी या पक्ष्याने अमेरिकेतील फ्लोरिडा येथे एका 75 वर्षीय व्यक्तीवर हल्ला केला. या हल्ल्यात तो इतका गंभीर जखमी झाला होता की त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. हे पक्षी शहामृग आणि इमूसारखे आहेत. सहसा दक्षिण पूर्व आशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये हे आढळतात. त्यांची उंची 6 फूट 6 इंच पर्यंत असू शकते आणि ते 60 किलो पर्यंत जड देखील आहेत.
सर्वात प्राणघातक हल्ला त्यांच्या चोचीने नव्हे तर पायाने करतात. त्यांचे पाय खूप मजबूत मानले जातात. जरी हे खूप लाजाळू पक्षी आहेत, परंतु जेव्हा त्यांना भीती वाटते तेव्हा ते 12 सेमी लांब नखे वापरतात आणि समोरच्या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला देखील करू शकतात. याचा परिणाम माणसाच्या अंतर्गत अवयवांवरही होतो आणि त्यामुळे अंतर्गत रक्तस्त्रावही होऊ शकतो.
अहवालानुसार, 2019 चा मृत्यू हा 93 वर्षांतील पहिला पुष्टी झालेला मृत्यू आहे.एप्रिल 1926 मध्ये फिलिप मॅक्लीन नावाच्या 16 वर्षीय शिकारीला या पक्ष्याने मारले होते. या पक्ष्यांचे रूप इतके धोकादायक आहे की त्यांना पाहिल्यानंतर लोकांचा जीव थरथर कापतो. पक्षी ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनाऱ्यांवर अनेकदा पाहायला मिळतो.