अहिल्यादेवींचे जीवन म्हणजे सुशासन, लोककल्याण आणि मानवतेचा आदर्श दीपस्तंभ: कुलगुरू डॉ. कामत

सोलापूर, दि. ३१- तीनशे वर्षांनंतरही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार आणि कार्य समाजाला प्रेरणा देत आहेत. त्यांचे जीवन हे सेवा, समर्पण, न्याय, विकास आणि मानवतेचा अखंड दीपस्तंभ असून सुशासनाचा आदर्श नमुना म्हणून आजही त्यांचा वारसा तितकाच प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती सांगता समारंभात डॉ. कामत हे बोलत होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर हे होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रघुराज मेटकरी, प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासनाचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले. मान्यवरांचा परिचय विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी करून दिला.
डॉ. कामत म्हणाले की, अहिल्यादेवींच्या आयुष्यात अनेक संकटे आणि वैयक्तिक दुःखाचे प्रसंग आले. मात्र त्यांनी प्रतिकूल परिस्थितीसमोर कधीही हार मानली नाही. धैर्य, चिकाटी आणि दूरदृष्टीच्या बळावर त्यांनी मालवा प्रदेशात आदर्श प्रशासन उभे केले. संकटांचे रूपांतर संधीत करून लोकसेवेला वाहून घेण्याचा त्यांचा आदर्श आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासन लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी कसे असावे याचे सर्वोत्तम उदाहरण अहिल्यादेवींच्या कार्यातून दिसून येते. त्यांनी न्यायव्यवस्था सक्षम केली, शेतकरी व व्यापाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आणि विकासाला मानवी मूल्यांची जोड दिली. त्यामुळे त्यांचे प्रशासन हे लोककेंद्रित शासन व्यवस्थेचे उत्कृष्ट उदाहरण ठरले. एकविसाव्या शतकातील विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात मूल्याधिष्ठित विकासाची आवश्यकता अधिक असल्याचे सांगताना डॉ. कामत म्हणाले की, प्रगतीला संवेदनशीलतेची, ज्ञानाला सामाजिक जबाबदारीची आणि नेतृत्वाला लोककल्याणाच्या भावनेची जोड आवश्यक आहे. अहिल्यादेवींचे जीवन या मूल्यांचे जिवंत उदाहरण आहे.
कुलगुरू डॉ. महानवर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन इतिहासाचे अभ्यास करण्याचे आवाहन केले. अहिल्यादेवींनी तीनशे वर्षांपूर्वी वृक्षारोपण, जल व्यवस्थापनाचे उत्कृष्ट कार्य केले आहे. त्यांचाच वारसा जपत आपल्या विद्यापीठाने पाच लाख वृक्ष लागवडीचा मोहीम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले. अहिल्यादेवी होळकर यांनी आदर्श प्रशासन चालवून उत्कृष्ट राज्यकारभार केला. त्यांचाच आदर्श आपण घेणे आवश्यक आहे. माझे विद्यापीठ आहे म्हणून सर्वांनी चांगले काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
रघुराज मेटकरी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण भारतभर हिंदू मंदिरांचा जिर्णोद्धार करण्याबरोबरच विहिरी, घाट, बारवांची निर्मिती केली. शेतकरी, व्यापारांसाठी लोकाभिमुख प्रशासन उभे केले. न्यायप्रिय महाराणी म्हणून त्या लोकप्रिय होत्या. त्यांच्या आदर्श कारभारातून सर्वांना प्रेरणा मिळते, असे त्यांनी यावेळी सांगितले. अहिल्यादेवींचा हुंडा देण्याच्या प्रथेला कडाडून विरोध होता. त्यांचे हे विचार आजही समाजाला उपयुक्त ठरतात. शेती करणाऱ्यांसाठी ‘सात-बारा’ पद्धत त्यांनी सुरू केल्याचे मेटकरी म्हणाले.
प्रारंभी सकाळी विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण झाले. गजीनृत्याचेही यावेळी सादरीकरण झाले. या समारंभात निबंध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. याचबरोबर अखिल भारतीय बहुभाषिक साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांच्या निवडक स्त्री आत्मकथने या पुस्तकाचाही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, पद्मजादेवी मोहिते पाटील, प्रा. देवानंद चिलवंत, प्रा. सचिन गायकवाड आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे व प्रा. श्रुती देवळे यांनी केले. तर आभार प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांनी मानले.



