दिलासादायक! राज्यात पेट्रोल, डिझेल झाले स्वस्त; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

नवी दिल्ली, 15 डिसेंबर : अंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये तेजी आल्याचं पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत 71.61 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये प्रति बॅरलमागे दोन डॉरलपेक्षा अधिक वाढ झाली आहे.
कच्च्या तेलाच्या भावात वाढ होत असताना भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेलचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून रोज सकाळी सहा वाजता पेट्रोल, डिझेलचे नवे दर जारी करण्यात येतात. जून 2017 पूर्वी पेट्रोलियम कंपन्या दर पंधरा दिवसांनी पेट्रोल. डिझेलचे नवे दर जारी करत होत्या.
पेट्रोलियम कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरानुसार बिहारमध्ये पेट्रोल 46 पैसे तर डिझेल 43 पैशांनी महाग झाले आहे. बिहारप्रमाणेच पश्चिम बंगालमध्ये देखील इंधन दरवाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 44 आणि 41 पैशांनी महाग झालं आहे. गोवा, हरियाणा आणि पंजाबमध्ये देखील पेट्रोल डिझेलच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. दुसरीकडे महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी आहे, महाराष्ट्रात पेट्रोल 61 पैशांनी तर डिझेल 58 पैशांनी स्वस्त झाले आहे. महाराष्ट्राप्रमाणेच राजस्थान, उत्तर प्रदेश, तेलंगाणा, झारखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये देखील इंधनाच्या दरात घसरण झाली आहे.
प्रमुख महानगरातील पेट्रोल, डिझेलचे दर
पेट्रोलियम कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरानुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर तर डिझेल 90.08 रुपये प्रति लिटर इतकं आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106.31 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.27 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 106.03 रुपये आणि 92.76 रुपये प्रति लिटर इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.80 रुपये तर डिझेल प्रति लिटर 94.40 रुपये इतके आहे.



