रिफायनरीच्या सर्वेक्षणविरोधातील आंदोलनाचा आज दुसरा दिवस
कोकणातील बारसू सोलगाव रिफायनरी विरोधी संघटनेचे मुंबईचे अध्यक्ष वैभव कोळवणकर यांना काल राजापूरमध्ये अटक झाली. त्यांच्यासोबत आणखी दोन सहकाऱ्यांना अटक करण्यात आली असून त्यांना रत्नागिरीत ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
कोकणातील रिफायनरीच्या सर्वेक्षणविरोधातील आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. प्रशासनाने समज देऊनही नागरिक आंदोलनावर ठाम आहेत. याशिवाय उद्धव ठाकरे आज या मुद्दयावर पत्रकार परिषदही घेणार आहेत. त्यामुळे रिफायनरीचा मुद्दा तापण्याची चिन्हे आहेत.
आंदोलक ठाम
प्रकल्प हद्दपार होत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. दरम्यान, पोलिसांनी जवळपास दोन हजारांचा फौजफाटा तैनात केला आहे.
रिफायनरीला विरोध केल्यामुळे पोलिसांनी काल वैभव कोळवणकर यांना अटक झाल्यानंतर आंदोलकांचे अटकसत्र सुरूच आहे.
प्रसारमाध्यमांना हटवण्याचा प्रयत्न
बारसू आंदोलन स्थळावरून पोलिसांनी प्रसारमाध्यमांना हटवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. रिफायनरीला स्थानिकांचा प्रचंड विरोध पहावयास मिळत आहे.
पोलिसांनी माध्यम प्रतिनिधींना दमदाटी केली. पुन्हा इथे दिसायचे नाही, असे म्हणत काही पत्रकारांना तर हाताला धरून बाहेर काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला.
महिलांनी अडवल्या पोलिसांच्या गाड्या
बारसू रिफायनरी सर्वेक्षणविरोधातील आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. पोलिसांकडून आंदोलकांना अटक होत आहेत. दरम्यान, आज सकाळी साडेआठच्या सुमारास आंदोलक महिलांनी पोलिसांच्या गाड्या अडवल्या. जीव गेला तरी बेहत्तर, पण आम्ही इथून हटणार नाही, अशा भावना आंदोलक महिलांनी व्यक्त केल्या.
उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद
उद्धव ठाकरे कोकणातील रिफायनरीच्या मुद्द्यावर आज पत्रकार परिषद घेणार आहे. सध्या पोलीस बळाच्या वापरावर होणाऱ्या अटकांवर ते माध्यमांशी बोलणार आहे. दुपारी ही पत्रकार परिषद असणार आहे.