अनुजा बावळे मृत्यू प्रकरणी न्यायासाठी लढा तीव्र; उदयनराजे भोसले यांची भेट, कारवाईची मागणी…

अवघ्या २२ वर्षीय अनुजा बावळे हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, संबंधित डॉक्टर व रुग्णालय प्रशासनाविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी आता तीव्र होत आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते वैभव गंगणे यांनी साताऱ्यात जाऊन खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेत सविस्तर निवेदन सादर केले.
मिळालेल्या माहितीनुसार, अनुजा बावळे हिला उपचारासाठी संबंधित रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान डॉ. माधुरी दबडे व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. योग्य वेळी उपचार न मिळणे, आवश्यक वैद्यकीय काळजी न घेणे तसेच परिस्थितीची वेळेवर माहिती न देणे, या बाबींमुळेच अनुजाचा मृत्यू झाला असल्याचा दावा कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.
या घटनेनंतर अनुजाच्या कुटुंबीयांनी तात्काळ न्याय मिळावा यासाठी पोलिस प्रशासनाकडे धाव घेतली. त्यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन संपूर्ण घटनेची माहिती दिली. पोलिस आयुक्तांनी या प्रकरणाची दखल घेत संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात आले. मात्र, या आदेशानंतरही तब्बल आठवडा उलटून गेला तरी अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दरम्यान, या प्रकरणाची दखल राज्य पातळीवर घ्यावी यासाठी वैभव गंगणे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ई-मेलद्वारे सविस्तर लेखी निवेदन पाठवले आहे. या निवेदनात संबंधित डॉक्टर व रुग्णालय कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच, साताऱ्यात झालेल्या भेटीत खासदार उदाहरण
यांना संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्यात आली. यावेळी गंगणे यांनी अनुजाच्या कुटुंबीयांची व्यथा मांडत न्यायासाठी तात्काळ हस्तक्षेप करण्याची विनंती केली. या मागणीची गंभीर दखल घेत खासदार उदयनराजे भोसले यांनी “अनुजाला निश्चितच न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू” असे आश्वासन दिले. तसेच संबंधित प्रशासनाशी संपर्क साधून योग्य ती कारवाई घडवून आणण्याचेही त्यांनी सांगितले.
या प्रकरणामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, रुग्णांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. निष्काळजीपणामुळे एखाद्या निष्पाप तरुणीचा जीव गमवावा लागणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याने दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटना, नागरिक तसेच नातेवाईकांकडून केली जात आहे.
अनुजा बावळे हिला न्याय मिळवून देण्यासाठी आता आंदोलनाचा इशाराही देण्यात येत असून, लवकरात लवकर गुन्हा दाखल करून दोषींना अटक करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. प्रशासन यापुढे काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


