सोलापूर: १ लाखाची जबरी चोरी अवघ्या १२ तासांत उघड; शहर गुन्हे शाखेकडून दोन आरोपी अटकेत..!

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत गस्त घालत असताना, शहर गुन्हे शाखेच्या पथकाने एका जबरी चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या १२ तासांत छडा लावला आहे. या प्रकरणी दोन सराईत संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रकमेसह एकूण २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
काय आहे घटना?
दत्त चौक भागातील राजेंद्र ज्वेलर्सच्या दुकानावरून पायी चालत जाणाऱ्या एका वयस्क व्यक्तीचा पाठलाग करून दोघांनी त्यांना दमदाटी केली. त्यांच्याकडील १,०००,०००/- (१ लाख) रुपये रोख असलेली पिशवी जबरदस्तीने हिसकावून घेऊन आरोपी मोटारसायकलवरून फरार झाले होते. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७०८/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०९ (४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
संशयितांना असे घेतले ताब्यात:
पोलीस उप-निरीक्षक विजय बनसुडे व त्यांच्या पथकाला खात्रीशीर बातमी मिळाली की, जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागील कम्पाऊंड भिंतीलगत, मार्केट चौकी ते हरिभाई प्रशाला जाणारे सार्वजनिक रस्त्यावर दोन संशयित तरुण काळ्या रंगाच्या युनिकॉर्न मोटारसायकलसह (क्र. MH-13-DF-5334) थांबले आहेत. पथकाने लागलीच सापळा रचून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी:
१. मल्लीनाथ राजशेखर जवळगी (वय ३६ वर्ष, व्यवसाय: ड्रायव्हर, रा. सध्या घर नं. ८१६, उत्तर कसबा शेटे वाडा सोलापूर, मुळ रा. सुलेरजवळगे, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर)
२. नागेश मल्लीनाथ बळते (वय १८ वर्ष २० दिवस, रा. ८१६ उत्तर कसबा शेटे वाडा, सोलापूर)
२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत:
पोलीस चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून खालील मुद्देमाल जप्त केला आहे:
चोरीस गेलेली रोख रक्कम: रु. १,०००,०००/-
गुन्ह्यात वापरलेली युनिकॉर्न मोटारसायकल (MH-13-DF-5334): रु. १,०००,०००/-
एकूण मुद्देमाल: रु. २,००,०००/-
पोलीस पथकाची कामगिरी:
सदर धडक कामगिरी पोलीस आयुक्त मा. श्री. एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त डॉ. अश्विनी पाटील (गुन्हे/वि.शा.), आणि सहायक पोलीस आयुक्त श्री. दिलीप पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक विजय बनसुडे, पोलीस अंमलदार वाजीद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे आणि शंकर याळगी यांच्या पथकाने केली आहे.



