गोविंदराज नगरात साकारला श्री गोविंदराज स्वामींचा भव्य धार्मिक देखावा..!

तिरुपती-तिरुमलाच्या मंदिराची अनुभूती; विडी घरकुल परिसरात नावीन्यपूर्ण संकल्पनेची नांदी
सोलापूर : गोविंदराज नगर गणेशोत्सव मंडळाच्यावतीने यंदा प्रथमच श्री गोविंदराज स्वामी मंदिराचा आकर्षक धार्मिक देखावा साकारण्यात आला आहे. या देखाव्याचे उद्घाटन नगरसेवक प्रथमेश कोठे, नगरसेवक अजय पोन्नम, नगरसेवक सतीश सिरसिला आणि सामाजिक कार्यकर्ते अविनाश दासरी यांच्या उपस्थितीत दाजी पेठ येथील बालाजी मंदिरातील प्रमुख पौरोहित्यांच्या समूहाच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मान्यवरांनी गोविंदराज नगर गणेशोत्सव मंडळाच्यावतीने दरवर्षी नवनवीन आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले जाते, असे सांगत मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
नगरसेवक प्रथमेश कोठे म्हणाले की, गोविंदराज नगर गणेशोत्सव मंडळ नेहमीच वेगळ्या संकल्पना राबविण्यात सक्रिय आणि अग्रेसर असते. यंदा प्रथमच साकारण्यात आलेल्या श्री गोविंदराज स्वामींच्या देखाव्यामुळे विडी घरकुल परिसरात तिरुपती-तिरुमला येथील श्री बालाजी मंदिरात आल्याचा भास निर्माण होत आहे. परिसरात अशा नावीन्यपूर्ण धार्मिक देखाव्यांची नवी सुरुवात झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.
नगरसेवक अजय पोन्नम म्हणाले की, यंदा सोलापुरात विविध गणेश मंडळांच्यावतीने श्रींच्या मूर्तीसमोर धार्मिक व सांस्कृतिक देखावे मोठ्या प्रमाणात साकारण्यात आले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवातील देखावे नागरिकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत असून सर्वच ठिकाणचे देखावे पाहण्यासारखे झाले आहेत.
यावेळी नगरसेवक सतीश सिरसिला आणि सामाजिक कार्यकर्ते अविनाश दासरी यांनी गोविंदराज नगर गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमावेळी उपस्थित मान्यवरांचा मंडळाच्यावतीने शाल व प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…!



