डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे 3 रे राष्ट्रीय महाअधिवेशन गोव्यात उत्साहात…
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन...

डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्राला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे ३ रे राष्ट्रीय महाअधिवेशन आज गोव्याची राजधानी पणजी येथील कला अकादमी येथे उत्साहात संपन्न झाले. या भव्य मेळाव्याचे उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सकाळी १० वाजता पार पडले. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील डिजिटल पत्रकार, संपादक या अधिवेशनात उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर गोव्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२६’ चे वितरण
या अधिवेशनाचे मुख्य आकर्षण म्हणजे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा ‘राष्ट्रीय गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
पत्रकारितेपुढील आव्हानांवर मंथन
“पत्रकारितेचे बदलते टप्पे आणि आव्हान” या विषयावर विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. ‘कोकणसाद’चे संपादक-संचालक संजय ना. ढवळीकर यांनी या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. डिजिटल पत्रकारितेचे भविष्य, नवनवीन तंत्रज्ञान आणि एआय (AI) सारख्या बदलांमुळे निर्माण होणारी आव्हाने यावर या सत्रात महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.
डिजिटल क्रांतीला नवी दिशा
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले की, “डिजिटल मीडिया हे आजच्या काळातील सर्वात प्रभावी माध्यम आहे. या क्षेत्रातील पत्रकारांच्या अडचणी सोडवणे आणि त्यांना मुख्य प्रवाहात भक्कमपणे उभे करणे हेच या अधिवेशनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
या महाअधिवेशनासाठी महाराष्ट्र, गोवा आणि देशभरातील हजारो डिजिटल पत्रकार व संपादक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डिजिटल मीडियाच्या इतिहासातील हा एक मैलाचा दगड असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.



