BREAKING NEWS : अजित पवारांच्या ‘त्या’ टीकेनंतर शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय ; “यापुढे मी निवडणूक लढणार नाही”

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे वारंवार शरद पवार यांच्या वयावरून आणि त्यांच्या निवडणूक लढवण्यावरून टीका करताना दिसून आले आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी देखील अजित पवार यांनी ८० वय झालं तरी लोक थांबत नाहीत अशी नाव न घेता शरद पवारांवर टीका केली होती.
दरम्यान, त्यांच्या या टीकेनंतर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी यापुढे निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले आहे.
आज मुंबईत पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांनी त्यांच्यावर वयावरून होत असलेल्या टीकेला उत्तर दिले. याविषयी बोलताना, “माझी खासदारकी अडीच वर्षांनंतर संपत आहे. त्यानंतर मी निवडणूक लढणार नाही हे मी ठरवलं आहे. माझी खासदारकीची टर्म शिल्लक आहे. त्यामुळं मी तोपर्यंत काम करत राहणार आहे. मला लोकांनी तिथं पाठवलंय तिथं मी काम करु नको का? माझ्या वयावर सातत्यानं बोललं जाते. मी 1967 पासून राजकारणात आहे . माझ्या विरोधकांनीही कधी यावर टीका केली नाही. मी अनेक संस्थांचा आजीवन अध्यक्ष आहे . तिथं मी काम करत राहणार आहे.” असेही त्यांनी यावेळी म्हटले.
पुढे त्यांनी आमदार अपात्रता निकालावर बोलताना राहुल नार्वेकर मुख्यमंत्री शिंदेंना भेटत असतील तर संशयाला जागा, राहुल नार्वेकरांनी प्रतिमा जपली पाहिजे. देवेंद्र फडणवीस उद्याच्या निकालानंतर सरकार स्थिर राहील असं जर म्हणत असतील याचा अर्थ त्यांना निकालाबाबत माहिती आहे, असे म्हणत फडणवीसांवर खोचक टीका केली. तसेच राहुल नार्वेकरांनी आपली प्रतिमा जपली पाहिजे, असा सल्ला देखील शरद पवारांनी नार्वेकरांना दिला आहे.
अयोध्येतील राम मंदिराविषयी बोलताना, “राम श्रद्धेचा विषय आहे. पक्षांकडून कोणतही रामाबाबत वक्तव्ये केलेलं नाही. जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य पक्षाचं वक्तव्य नाही. मुंबईचे पालकमंत्री शाळांमध्ये रामाबाबत स्पर्धा घेण्यासाठी सक्ती करत आहेत हे योग्य नाही. हा देश सेक्युलर देश आहे. मी गर्दीत रामाच्या दर्शनाला जाणार नाही. माझी राज्यसभेचा कार्यकाळ अडीच वर्षानंतर संपत आहे त्यानंतर जाईल,” असे त्यांनी सांगितले.



