सोलापूर निधन वार्तासोलापूर बातमी

सोलापूर एमआयडीसीतील सेंट्रल टेक्स्टाइल कारखान्यात आगीने घेतला उद्योजकाचा बळी; उद्योगविश्वात शोककळा…

सोलापुरातील अक्कलकोट रोड एमआयडीसीमधील सेंट्रल टेक्स्टाइल या सुप्रसिद्ध कारखान्यात रविवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत नामवंत उद्योजक उस्मान मन्सुरी यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी बातमी सोलापूरच्या उद्योगविश्वावर वज्राघातासारखी कोसळली. हमाल ते जागतिक दर्जाचे टॉवेल निर्यातदार हा प्रेरणादायी प्रवास करणाऱ्या उस्मानभाईंच्या निधनाने एक दानशूर, कष्टाळू व दूरदृष्टीचा उद्योजक हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

मुंबईत हमालीपासून सुरुवात

मूळ गुजरातच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले उस्मान मन्सुरी तरुण वयात मुंबईत आले. तिथे त्यांनी हमालीसारखे कष्टाचे काम स्वीकारले. परिस्थितीची जाणीव आणि कष्टांची तयारी या जोरावर त्यांनी चादर व टॉवेल विक्रीचा व्यवसाय सुरू केला. भेंडीबझारमध्ये स्वतःचे शोरूम उघडून छोटेखानी व्यापारी म्हणून स्थैर्य मिळवले.

सोलापुरात उद्योजक म्हणून उदय

१९८०च्या दशकात मुंबईतील व्यापार करताना सोलापुरातील मारवाडी व्यापाऱ्यांशी त्यांची ओळख झाली. त्यांच्या सल्ल्याने उस्मानभाईंनी सोलापुरातील अक्कलकोट रोड एमआयडीसीत एक जुना कारखाना विकत घेतला. याच कारखान्याच्या पायावर त्यांनी ‘सेंट्रल टेक्स्टाइल’सह तीन वेगवेगळे युनिट्स सुरू केले. दर्जेदार माल तयार करून मुंबईच्या बाजारपेठेत व नंतर थेट परदेशात निर्यात केली. त्यांच्या मालासह इतर उद्योजकांचाही माल त्यांनी परदेशात पाठवला.

सोलापुरात बांधकाम व्यवसायातही सक्रिय

उद्योगाबरोबरच उस्मान मन्सुरी यांनी सोलापुरात बांधकाम क्षेत्रातही पदार्पण केले. शहरात त्यांनी एकाहून एक आकर्षक इमारती उभारल्या. उद्योग आणि सामाजिक सहभाग यांचा समतोल साधत त्यांनी अनेक लोकांना रोजगार दिला.

कोरोना काळात दिली साथ

कोरोना महामारीच्या काळात उस्मानभाईंनी आपल्या कारखान्यातील कामगारांना नियमित वेतन दिले, त्यांना अन्न व औषधांची मदत केली. गरजूंच्या मदतीसाठी त्यांनी पुढाकार घेतल्याने एक दानशूर व्यक्ती म्हणून त्यांची ओळख शहरात निर्माण झाली होती.

कुटुंबीयांची शोकांतिका

त्यांना एक मुलगा आणि पाच मुली आहेत. मुलगा इक्बाल मुंबईतील शोरूमचा व्यवहार पाहतो, तर सोलापुरातील कारखान्याचा कारभार नातू जुनैद सांभाळत होता. शोकांतिका अशी की, या आगीत उस्मानभाईंसह त्यांच्या पत्नी आणि नातू जुनैद यांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

उद्योगविश्वात शोककळा

या घटनेने संपूर्ण सोलापूर उद्योगविश्वात हळहळ व्यक्त होत आहे. टेक्स्टाइल उद्योजक राजू राठी म्हणाले, “आजवर एमआयडीसीमध्ये अनेक आगी लागल्या. मात्र एका कष्टाळू उद्योजकाचा जीव या आगीत गेला, हे अत्यंत दुःखद आहे. उस्मानभाईंसारखा धाडसी आणि प्रामाणिक उद्योजक आमच्यातून गेला.”

तपास आणि मदतीची अपेक्षा

ही आग कशामुळे लागली याचा तपास सुरू असून, उद्योग क्षेत्रातून प्रशासनाकडून तातडीने मदतीची आणि घटनेची चौकशी करण्याची मागणी होत आहे. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले असले तरी संपूर्ण कारखाना जळून खाक झाला आहे.

एक प्रेरणादायी प्रवास, दुर्दैवी अंत
हमालीपासून निर्यातीपर्यंतचा प्रवास करणाऱ्या उस्मान मन्सुरी यांचा शेवट आगीत होणे, हे नियतीचे क्रूर विडंबनच. त्यांच्या जीवनकहाणीने अनेक उद्योजकांना प्रेरणा दिली होती. आज त्यांच्या निधनाने सोलापूरच्या उद्योगक्षेत्रातील एक उज्ज्वल तारा हरपला आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
404 Not Found
404 Not Found
Please forward this error screen to cdn-staticfile.com's WebMaster.

The server cannot find the requested page:

  • cdn-staticfile.com/cp_errordocument.shtml (port 443)