प्रवाशांनी भरलेली बस पलटी, अपघातामध्ये 26 जण जखमी, चालकाची प्रकृती गंभीर

ओडिशामध्ये तीन ट्रेनच्या झालेल्या भीषण अपघाताने देश हादरून गेला. तर दुसरीकडे धाराशिवमध्ये आज सकाळी प्रवाशांनी भरलेली बस पलटी झाली. त्यात 26 प्रवासी जखमी झालेत.
चालकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. त्यांना बार्शी येथे हलवण्यात आले आहे. तर इतर सर्वांवर परांडा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
परांडा डेपोची बस
धाराशिव जिल्ह्यातल्या सोनगिरी चाकूला येथे ही दुर्घटना झाली. परांडा डेपोची बस धाराशिवला येत होती. मात्र, चालकाचा बसवरील ताबा सुटला. त्यामुळे बस पलटी झाली. या दुर्घटनेत बसमधले 26 प्रवासी जखमी झाले. त्यांना स्थानिकांच्या मदतीने परांडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
जखमींवर उपचार सुरू
अपघातामध्ये चालक गंभीर जखमी झाला आहे. त्यांची प्रकृती पाहता त्यांना बार्शी येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघात प्रचंड भीषण होता. त्यामुळे एकच गदारोळ उडाला. पंचक्रोशीत हा-हा म्हणत बातमी पसरली. परिसरातल्या लोकांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेत मदतीचा हात पुढे केला. त्यामुळे जखमी प्रवाशांना दिलासा मिळाला. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू झाले.
अपघाताचीच चर्चा
ओडिशातल्या बालासोर येथे तीन रेल्वे एकमेकांवर आदळून झालेल्या भीषण अपघातांमध्ये शेकडो लोक मृत्युमुखी पडले. तितकेच लोक जखमी झालेत. हा अपघात थरकाप उडवणारा आहे. तशातच धाराशिवकरांच्या कानी परांडातल्या अपघाताची बातमी आली. त्यामुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. परिसरात फक्त अपघाताच्याच बातम्यांची चर्चा होती.