सोलापूर हादरलं! प्रॉपर्टीचा वाद टोकाला, झोपेत आई आणि दोन मुलांवर तलवारीने सपासप वार…

सोलापूर शहरापासून अगदी जवळच असलेल्या बोरामणी गावात तिहेरी हत्याकांड घडले आहे. तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.संपत्तीच्या वादातून दिरानेच मृत भावाच्या संसारावर तलवारीने घाव घालत वहिनी, पुतणी आणि पुतण्याचा जीव घेतल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. गायत्री सुधाकर मस्के(वय42 वर्षे), मुलगी प्रिया सुधाकर मस्के( वय 18 वर्षे),आणि मुलगा शिवराज सुधाकर मस्के (वय 16 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. पप्पू म्हस्के असे संशयित आरोपीचे नाव आहे, तालुका पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. तिन्ही मृतदेह पोस्टमार्टम साठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. शेतीच्या वादातून हे तिहेरी हत्याकांड झाल्याची प्राथमिक समोर आली आहे.
पतीच्या निधना नंतर दोन लेकरांना घेऊन राहत होती –
गायत्री म्हस्के या पतीच्या निधनानंतर अत्यंत हलाखीच्या परिस्थित आयुष जगत होती. कुटुंबप्रमुख सुधाकर म्हस्के यांच्या निधनानंतर गायत्री म्हस्के आपल्या दोन लेकरांना घेऊन संघर्षमय जीवन जगत होती. मात्र, म्हस्के कुटुंबावर मध्यरात्री रक्तरंजित संकट कोसळले. गायत्री व तिच्या दोन्ही लेकरांना संपत्तीच्या वादातून ठार केले आहे.
तिघे गाढ झोपेत होते;चुलता आला आणि तिघांवर सपासप वार केले –
संशयित आरोपी पप्पू म्हस्के हा मध्यरात्री स्वतःच्या घरातून हातात तलवार घेऊन कॉमन गच्चीवर गेला. संबंधित कुटुंबातील घरांना एकाच गच्चीवर जाण्याचा मार्ग सामायिक असल्याची माहिती समोर आली आहे. त्या वेळी मयत तिघे गच्चीवर झोपले होते.याच वेळी संपत्तीच्या वादातून जोरदार हाणामारी सुरू झाली आणि हातातील तलवारीने संशयिताने प्रथम भावजयी गायत्री मस्के यांच्यावर सपासप वार केल्याचे समोर येत आहे. आईवर होत असलेला जीवघेणा हल्ला पाहून मुलगी प्रिया आणि मुलगा शिवराज हे आईला वाचवण्यासाठी मध्ये पडले. मात्र, क्रूरतेचा कळस गाठत संशयिताने आई आणि मुलीवर तलवारीने वार करत त्यांना रक्ताच्या थारोळ्यातच संपवले.
दरम्यान, गंभीर जखमी अवस्थेत असलेला मुलगा शिवराज जीव वाचवण्यासाठी गच्चीवरून खाली आपल्या घराकडे पळत आला. पण आरोपीने त्याचाही पाठलाग करत त्याला गाठले आणि त्याच्यावरही जीवघेणे वार करून त्याचा अंत केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दोन मृतदेह गच्ची वर तर मुलगा खाली मृतावस्थेत आढळला –
घटनेनंतर गच्चीवर आई आणि मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आल्या, तर मुलगा घराच्या खालील भागात मृतावस्थेत सापडला. घटनास्थळी रक्ताने माखलेली तलवारही पोलिसांना आढळून आल्याची माहिती मिळाली आहे.या भीषण घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी, गुन्हे शाखेचे पथक तसेच फॉरेन्सिक टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण परिसर पोलिस बंदोबस्तात घेण्यात आला असून पुरावे संकलन आणि पंचनामा सुरू आहे.आधी पतीचा आधार हरपलेले हे कुटुंब जगण्यासाठी संघर्ष करत होते. आई लेकरांना घेऊन संसाराचा गाडा हाकत होती. पण संपत्तीच्या वादाने एवढे विकृत रूप धारण केल की, त्याच कुटुंबातील तिघांचे रक्त एकाच रात्री सांडले. आईला वाचवण्यासाठी धावलेल्या लेकरांचाही निर्दयीपणे खून करण्यात आल्याने बोरामणी परिसरात प्रचंड संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.



