सोलापुरात मेंढपाळाला बेदम मारहाण; २४ तासांत अटक नाही तर आंदोलन…

दक्षिण सोलापूर तालुक्यातील येळेगाव-निंबार्गी शिवारात मेंढ्या शेतात गेल्याच्या क्षुल्लक कारणावरून मेंढपाळ बाळू ठेंगले यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ सकल धनगर समाज व मेंढपाळ हक्क संरक्षण समिती, सोलापूरच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
२७ जुलै २०२६ रोजी झालेल्या या घटनेत समाजकंटकांनी बाळू ठेंगले यांच्यावर दगड व काठ्यांनी अमानुष मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या ठेंगले यांच्यावर सध्या सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
निवेदनात आरोपींवर ॲट्रॉसिटी कायदा, भारतीय दंड संहितेचे कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) तसेच इतर गंभीर कलमांनुसार गुन्हे दाखल करून २४ तासांच्या आत अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच भटकंती करणाऱ्या धनगर समाजातील मेंढपाळांना वारंवार होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर विशेष कायदेशीर संरक्षण देण्याची मागणीही करण्यात आली.
रानावनात आणि निर्जन भागात राहणाऱ्या मेंढपाळांच्या जीवित व पशुधनाच्या सुरक्षेसाठी इच्छुक व पात्र मेंढपाळांना सुलभ प्रक्रियेद्वारे शस्त्र परवाना देण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. याशिवाय जखमी बाळू ठेंगले यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनाने उचलावा आणि त्यांना तातडीची आर्थिक मदत जाहीर करावी, अशीही मागणी करण्यात आली.
दरम्यान, प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात सकल धनगर समाजाच्या वतीने तीव्र आणि व्यापक आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब वाघमोडे, धर्मराज पुजारी, रणजित मळगे, अप्पाराव हाके, करण गडदे, मनोज सलगर, सुधीर सलगर, अप्पासाहेब होनमाने, स्वामीराज घोडके, अर्चना बंडगर, अशोक डोणे, चंद्रशेखर पाटील, अजय देवकते यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघर्ष सेनेचे शेखर बंगाळे यांनीही या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला…



