अँड राजेश कांबळे खून खटल्यास पुन्हा प्रारंभ : दोन साक्षीदारांची महत्त्वपूर्ण साक्ष…

ॲड. राजेश श्रीमंत कांबळे वय 45 राहणार 43, ब्रह्मचैतन्य नगर नवीन आर. टी. ओ. सोलापूर याचा खून केल्याप्रकरणी आरोपी संजय उर्फ बंटी महादेव खरटमल, अँड सुरेश तारू चव्हाण व श्रीनिवास महांकाळी येलदी यांच्यावर भरलेल्या खटल्याच्या सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.जे.जे.मोहिते यांच्यासमोर सुरू झाला.
यात हकीकत अशी की, दिनांक 8-6-2019 रोजी यातील मयत अँड राजेश कांबळे हा सकाळी अकरा वाजेचे सुमारास पक्षकारांना भेटून एका तासाने परत येतो असे त्याच्या पत्नीस सांगून त्याच्या घरातून मोटरसायकलवर निघून गेला होता.
त्यानंतर त्याच्या पत्नीने दुपारी बाराच्या सुमारास फोन लावला असता मयत राजेश याने मी बंटीच्या घरी आहे केस संदर्भात चर्चा चालू आहे असे सांगितले .त्यानंतर त्याची पत्नी त्याचा भाऊ यांनी फोन लावला असता मयत राजेश याचा फोन बंद लागत होता. रात्री शोधा शोध केली तरी मयत राजेश कांबळे हा मिळून आला नाही. त्यावर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली होती. तपासादरम्यान यातील आरोपी बंटी खरटमल याच्यावर संशय बळावला तसेच पोलिसांना बंटी खरटमल याच्या घरातून दुर्गंधी येत असल्याचे दिसून आले. त्यावेळी पोलिसांनी घराचे कुलूप तोडून आत पाहिले असता मयत राजेश कांबळे याचे हात, पाय,धड व मुंडके हे तोडून दोन प्लास्टिक बॅगेत भरलेले दिसून आले. त्यावर पोलिसांनी खुनात सहभाग असलेले वरील तिन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले होते.
आजरोजी खटल्याच्या सुनावणीच्या वेळी साक्षीदार नायब तहसीलदार श्रीमती सुवर्णा खरमाटे यांनी आपल्या साक्षीत यातील आरोपी संजय उर्फ बंटी महादेव खरटमल व दुसरा आरोपी सुरेश तारू चव्हाण यांना साक्षीदारांनी ओळख परेड मध्ये ओळखल्याचे महत्त्वपूर्ण साक्ष दिली तसेच मयताच्या अंगावरील दागिने म्हणजे दोन सोन्याची चैन दोन सोन्याच्या अंगठ्या व एक चांदीची अंगठी हे साक्षीदारांनी ओळख परेडमध्ये ओळखल्याची महत्त्वपूर्ण साक्ष दिली.
त्यानंतर दुसरा साक्षीदार सोमनाथ गोरख चांडोले यांनी आपल्या साक्षीत यातील आरोपी बंटी खरटमल याने मयताच्या बोटातील दोन सोन्याच्या अंगठ्या या सोनार आरोपी श्रीनिवास येलदि यास विकल्या होत्या, त्याचे दुकान दाखवतो असे निवेदन त्याने दिले त्याप्रमाणे त्याने श्रीनिवास येलदि याचे दुकान दाखविले दुकानात गेल्यावर श्रीनिवास येलदि याने त्या दोन सोन्याच्या अंगठ्या पोलिसांना दिल्या व त्याबाबतचा पंचनामा केला, अशी महत्त्वपूर्ण साक्ष नोंदवली.
आरोपींच्या वकिलांनी घेतलेल्या उलट तपासात साक्षीदाराने नकारात्मक उत्तरे दिली.
सदर खटल्यास पुढील तारीख 05/06/2025 ही तारीख नेमण्यात आली.
या खटल्यात विशेष सरकारी वकील अँड. उज्वल निकम, मूळ फिर्यादीतर्फे अँड.मिलिंद थोबडे अँड.विनोद सूर्यवंशी तर आरोपी नंबर 1 तर्फे अँड राजेंद्र फताटे आरोपी नंबर 2 तर्फे अँड नागराज शिंदे आरोपी नंबर ३ तर्फे अँड धनंजय माने हे काम पाहत आहेत.