सोलापुरात 70 फूट रोडवर भरदिवसा तरुणाची निर्घृण हत्या, हल्ला सीसीटीव्हीत कैद…

सोलापूर : शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील 70 फूट रोड परिसरात रविवारी सकाळच्या सुमारास एका तरुणाची भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुरेश कृष्णा श्रीराम (वय अंदाजे 35) या तरुणावर 7 ते 8 जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला केला. हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांचा वापर करत त्याच्यावर सपासप वार केले. इतकेच नव्हे तर, डोक्यात दगड घालून त्याची हत्या करण्यात आली. हा संपूर्ण प्रकार भर रस्त्यावर घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, हा हल्ला परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्यातील दृश्ये अत्यंत धक्कादायक असल्याचे समोर येत आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी पाठवला आहे. खून नेमका कोणत्या कारणातून झाला, याचा तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे.
घटनेनंतर 70 फूट रोड परिसरात मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. या घटनेमुळे सोलापूर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होत आहे…



