शिक्षण सम्राट डॉ. फैजअहमद शेख यांचे निधन; लोकप्रहार न्यूजची स्पेशल स्टोरी….

सोलापूर शहराच्या शैक्षणिक, सामाजिक व सहकार क्षेत्राला आयुष्यभर समर्पित असलेले, शिक्षण सम्राट म्हणून ओळखले जाणारे डॉ. फैजअहमद हाजी नबीसाब शेख यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सोलापूरसह महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात मोठी हानी झाली असून, एक दूरदृष्टी असलेले मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
डॉ. फैजअहमद शेख हे दि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी उर्दू हायस्कूल, सोलापूर या संस्थेचे संस्थापक चेअरमन होते. सन 1979 मध्ये त्यांनी या शाळेची स्थापना करून अल्पसंख्याक, गरजू व सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले. शिक्षण हीच खरी सामाजिक परिवर्तनाची ताकद आहे, हा विचार त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केला.
शिक्षण क्षेत्राबरोबरच सहकार क्षेत्रातही त्यांनी मोलाचे योगदान दिले. ते सोलापूर सोशल बँकेचे संस्थापक व चेअरमन होते. विविध बँका, संस्था व सामाजिक संघटनांमध्ये त्यांनी जबाबदारीची पदे भूषवून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य केले.
डॉ. फैजअहमद शेख यांचे कार्य केवळ संस्थात्मक मर्यादेत अडकलेले नव्हते, तर त्यांनी अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले विद्यार्थी आज देश-विदेशात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यामुळे त्यांना शिक्षण सम्राट अशी ओळख मिळाली होती.
सध्या ते शिकागो (अमेरिका) येथे वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, सुना, जावई, नातू व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा दफनविधी गुरुवारी शिकागो, अमेरिका येथे होणार आहे.
त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सोलापूर शहरात शोककळा पसरली असून, विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना, शिक्षक, माजी विद्यार्थी व नागरिकांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
डॉ. फैजअहमद हाजी नबीसाब शेख यांनी शिक्षण, समाजसेवा आणि सहकार या क्षेत्रात दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील अनेक पिढ्यांना दिशा देत राहील, असे सर्वत्र व्यक्त होत आहे…
डॉक्टर फैज अहमद शेख यांचे कार्याला लोकप्रहार न्यूज चैनल च सलाम…



