अवैधरित्या गोवंशीय जनावरे वाहतूक करीत असता पोलिसांवरील जीवघेणा हल्ला प्रकरणी अटकेतील आरोपीस जामीन मंजूर.

वरील प्रकरणात सदर बाजार पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे क्रमांक – ७३०/२०२३ अंतर्गत दिनांक ११/११/२०२३ रोजी आरोपी ट्रक चालक समीर कुरेशी व इतरांविरुद्ध (भादवी ३०७,३५३,४२७,४२९) व (नागरी क्षेत्रात गुरे पाळणे आणि तयाची ने-आण करणे (नियंत्रण) अधिनियम १९७६ चे कलम ३ आणि १३) व (महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५,९,११) व (प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ९ आणि ११ )तसेच (प्राण्यांचे परिवहन नियम १९७८ चे कलम ४६,५६ )तसेच (महाराष्ट्र मोटर वाहन नियम १९८९ चे कलम ८३,१७७ ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल काळजी यांनी मिळालेल्या माहितीनुसार पहाटे ६:३० ते ७:०० दरम्यान गुरुनानकचौक येथे एक तपकीर रंगाची आयशर टेम्पो गोवंशीय जनावरे घेऊन येणार आहे तसेच वरील माहितीनुसार सदर बाजार पोलीस ठाणे येथील शासकीय वाहनाने गुड मॉर्निंग पथक हे रवाना झाले होते व त्यानंतर तालुका पोलीस ठाणेच्या जवळ राज रदी डेपोच्या समोरील सार्वजनिक रोडच्या बाजूस सापळा लावून थांबले असता सुमारे ६:४० वाजेच्या सुमारास माहितीप्रमाणे तपकिरी रंगाचे आयशर टेम्पो क्रमांक एम एच -११- एम -४७८९ हे आढळून आले व सदरची टेम्पो चालकास पोलीस कर्मचाऱ्यांनी हाताने टेम्पो थांबवण्यास इशारा केला असता चालकांनी तसेच त्याच्यासोबत टेम्पोमध्ये असलेले दोन्ही आरोपींनी पोलिसांना पाहून जीवे मारण्याचे उद्देशाने त्यांच्या ताब्यातील टेम्पो अंगावर घातली होती आणि त्यानंतर टेम्पो चालक व इतर दोन आरोपी हे पळून गेले होते. सदर टेम्पो मध्ये एकूण २१ नग गोवंशीय जनावरे आढळून आले होते. या घटनेत शासकीय वाहनाचे दरवाजा तुटून आर्थिक नुकसान तसेच सरकारी कामांमध्ये अडथळा निर्माण करून आरोपी पळून गेले होते. यातील ट्रक चालक समीर कुरेशी याला दिनांक ०७/०३/२०२३ अटक करण्यात आले होते. तदनंतर आरोपींने आपला जामीन अर्ज मे.जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री खुणे यांनी आरोपी ट्रक चालकाचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला आहे. यात आरोपीतर्फे ॲड.कदीर औटी,ॲड. दत्तात्रेय कापुरे,ॲड. निलेश कट्टीमनी, ॲड. सोहेल रामपुरे, ॲड. वैभव भोंगे यांनी काम पाहिले.