सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर क्राईमसोलापूर निधन वार्ता

सोलापुरात विहिरीत पोहताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; नातेवाईकांकडून घातपाताचा संशय, सखोल चौकशीची मागणी…

सोलापूर तालुक्यातील होटगी शिवार परिसरात एक हृदयद्रावक व धक्कादायक घटना घडली असून, शेतातील विहिरीत पोहण्यासाठी उडी मारलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या पाठीमागील बाजूस असलेल्या होटगी शिवारातील एका शेतात घडली.
या घटनेत सादिक अ. हमीद शेख (वय ३२, रा. नई जिंदगी, सोलापूर) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हुरडा पार्टी झाल्यानंतर सादिक शेख हे आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी संबंधित शेतातील विहिरीत उतरले होते. मात्र, पोहत असताना विहिरीच्या तळाशी साचलेल्या गाळात त्यांचा पाय अडकल्याने ते पाण्याखाली अडकले आणि त्यातच त्यांचा बुडून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिक व मित्रांच्या मदतीने शोधमोहीम राबविण्यात आली. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर सादिक शेख यांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तातडीने त्यांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, सादिक शेख यांच्या मृत्यूने नातेवाईक व मित्रपरिवार शोकाकुल झाला आहे. दरम्यान, मृताच्या नातेवाईकांनी हा अपघात नसून घातपाताचा संशय व्यक्त केला असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सादिक शेख हे व्यवसायाने इलेक्ट्रिशियन होते. मेहनती, शांत व कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची परिसरात ओळख होती. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी तसेच चार बहिणी असा मोठा परिवार आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी सादिक यांच्यावरच होती. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या प्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, शवविच्छेदन अहवालानंतर पुढील तपासाची दिशा ठरवली जाणार आहे. पोलीस सर्व शक्य त्या बाजूंनी तपास करत असून, नातेवाईकांच्या संशयाच्या अनुषंगानेही चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे….

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel