बापरे! नई जिंदगी चौकात पोलिसांचा फौजफाटा; नेमकं काय घडलं…?

सोलापूर शहरातील नई जिंदगी परिसरात अचानक मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आणि पोलिसांचा फौजफाटा पाहून नागरिकांमध्ये काही काळ चर्चेला उधाण आले. मात्र कोणतीही अनुचित घटना घडलेली नसून आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वतीने विशेष रूट मार्च काढण्यात आला.
या रूट मार्चमध्ये एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह स्थानिक पोलीस चौकीचे कर्मचारी, एसआरपी जवान, आरसीपी पथक तसेच होमगार्ड जवान मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नई जिंदगी चौकासह परिसरातील प्रमुख रस्त्यांवरून हा मार्च काढण्यात आला.
बकरी ईदचा सण शांततेत आणि उत्साहात पार पडावा, तसेच कोणत्याही अफवा किंवा गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी पोलिसांकडून नागरिकांना शांतता व सौहार्द राखण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधत कायदा हातात न घेण्याचा तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचा संदेश दिला.
सणासुदीच्या काळात नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सोलापूर पोलिसांकडून विविध भागांमध्ये अशा प्रकारचे रूट मार्च आणि सुरक्षा पाहणी सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून नई जिंदगी परिसरात हा रूट मार्च आयोजित करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून बकरी ईद सण शांततापूर्ण वातावरणात साजरा करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.



