आश्रमशाळांमध्ये ‘सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान’..!

आश्रमशाळांमध्ये ‘सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान’
१९ ते २६ सप्टेंबर २०२६ दरम्यान अभियान
सर्पमित्र, सर्पतज्ज्ञ व आरोग्य विभागाच्या सहकार्याने जनजागृती
मुंबई, दि. १० : आदिवासी विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षितता लक्षात घेऊन आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य मॉडेल निवासी शाळा तसेच वसतिगृहांमध्ये १९ ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ‘सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्पदंश प्रतिबंध, सुरक्षित वर्तन, आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजना तसेच वेळेत वैद्यकीय उपचार घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक आदिवासी विकास विभागाचे आयुक्त (प्र.) गोपीचंद कदम यांनी दिली.
आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शाळा व वसतिगृहे प्रामुख्याने डोंगराळ, दुर्गम व वनक्षेत्रालगतच्या भागात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा साप, विंचू तसेच इतर वन्यजीवांशी संपर्क येण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजनांसोबतच सर्पदंशाबाबत व्यापक जनजागृती करण्यावर अभियानात विशेष भर देण्यात येणार आहे.
अभियानांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य मॉडेल निवासी शाळा आणि वसतिगृह स्तरावर स्थानिक सर्पमित्र, सर्पतज्ज्ञ तसेच आरोग्य व वन विभागाच्या सहकार्याने किमान एक तासाचे विशेष जनजागृती सत्र आयोजित करण्यात येणार आहे. साप आढळल्यास सुरक्षित अंतर राखणे, शांतपणे त्या ठिकाणापासून दूर जाणे, सापाला पकडण्याचा अथवा मारण्याचा प्रयत्न न करणे, सर्पदंश झालेल्या व्यक्तीची हालचाल कमीत कमी ठेवणे आणि तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करणे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच सर्पदंशासंदर्भातील अंधश्रद्धा व गैरसमज दूर करण्यासाठी वैज्ञानिक माहिती देण्यात येणार आहे.
विभागाच्या डिजिटल स्टुडिओच्या माध्यमातूनही सर्पदंश प्रतिबंध, सुरक्षित वर्तन आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य प्रतिसाद याबाबत तज्ज्ञांची मार्गदर्शनपर सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र शासनाने १८ ऑगस्ट २०२६ रोजी सर्पदंशाचा अधिसूचित आजार म्हणून समावेश केला आहे. त्यानुसार सर्पदंशाच्या घटनांची वेळेत नोंद व अहवाल सादर करणे, त्याचे निरीक्षण करणे तसेच Anti-Snake Venom (ASV) उपलब्धता आणि साठवणूक केंद्रांची माहिती अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. या अनुषंगाने संबंधित यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
अभियानाच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा किंवा वसतिगृहाच्या परिसरात कोणताही जिवंत साप आणून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करू नये, असे सक्त निर्देश देण्यात आले आहेत.
आपत्कालीन संपर्क यंत्रणा अद्ययावत करणे
मुख्याध्यापक, अधीक्षक आणि परिचारिका यांनी जवळच्या आरोग्य संस्थेचे नाव व संपर्क क्रमांक, Anti-Snake Venom उपलब्ध असलेल्या आरोग्य संस्थांची माहिती, आपत्कालीन वाहतूक व्यवस्था व संपर्क क्रमांक तसेच स्थानिक सर्पमित्रांचे संपर्क क्रमांक दर तीन महिन्यांनी अद्ययावत ठेवावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अभियानांतर्गत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल संबंधित स्तरावर सादर करणे बंधनकारक राहणार आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अभियान महत्त्वपूर्ण
“आदिवासी विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षितता ही विभागाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियानाच्या माध्यमातून दुर्गम भागातील आश्रमशाळांमधील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांमध्ये सर्पदंशाबाबत योग्य जनजागृती निर्माण होऊन आपत्कालीन परिस्थितीत प्राण वाचविण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठीही हे अभियान महत्त्वपूर्ण ठरेल,” असे नाशिक आदिवासी विकास विभागाचे आयुक्त (प्र.) गोपीचंद कदम यांनी सांगितले..!



