बाबा अड्डेवाले आणि गाझी जागीरदारांची इम्तियाज जलील यांच्याशी भेट; सोलापूरच्या राजकारणाची चर्चा…

सोलापूर : एमआयएमच्या सोलापूर पक्ष संघटनेला अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. एमआयएमचे सोलापूर पक्ष निरीक्षक अन्वर सादत यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक बाबा अड्डेवाले, माजी नगरसेवक गाझी जागीरदार, महिला शहराध्यक्ष सलमा सय्यद, मोबीन नदाफ आणि कमो शेख यांनी एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेतली.
या बैठकीत सोलापूर शहरातील सध्याची राजकीय परिस्थिती, पक्षाची संघटनात्मक बांधणी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी, पक्षविस्तार आणि बूथस्तरावरील संघटना मजबूत करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील विविध भागांमध्ये पक्षाचे जनसंपर्क अभियान अधिक प्रभावीपणे राबविणे, नवीन कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडणे आणि नागरिकांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे आवाज उठविणे, यावरही बैठकीत भर देण्यात आला.
शिष्टमंडळाने सोलापूर शहरातील स्थानिक प्रश्न, विकासकामे, नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी तसेच पक्षाच्या भविष्यातील कार्यक्रमांची माहिती इम्तियाज जलील यांना दिली. यावेळी पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शनही करण्यात आले.
बैठकीत आगामी काळात सोलापूरमध्ये पक्षाचे विविध जनसंपर्क कार्यक्रम, बैठका आणि संघटनात्मक उपक्रम राबविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. तसेच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करून पक्षाची ताकद वाढवावी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करावा, असे आवाहनही करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या भेटीमुळे सोलापूरमधील एमआयएमच्या राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आगामी काळात पक्षाच्या संघटनात्मक उपक्रमांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे…



