सोलापूर क्राईमsolapurpoliceसोलापूर बातमी

सोलापूर लोहमार्ग पोलिसांची ‘सुपरफास्ट’ कारवाई! ९ लाखांचा मुद्देमाल परत मिळवला…

बिकानेर एक्सप्रेसमध्ये प्रवाशाच्या झोपेचा फायदा घेत सुमारे ९ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व लेडीज पर्स चोरी करणाऱ्या आरोपीला सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक करून मुद्देमाल हस्तगत केला आहे.
फिर्यादी अरिहंतकुमार पारसमल जैन (वय ३५, रा. बेंगळुरू) हे २६ जून रोजी रेल्वे क्रमांक १६५८७ बिकानेर एक्सप्रेसने बेंगळुरूहून जोधपूरकडे प्रवास करत होते. २७ जून रोजी सकाळी सोलापूर रेल्वे स्थानक सुटल्यानंतर होटगी–सोलापूर दरम्यान त्यांच्या झोपेचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने व इतर साहित्य लंपास केले.
टीटीईकडे तक्रार दिल्यानंतर आरपीएफमार्फत माहिती सोलापूर लोहमार्ग पोलिसांकडे पोहोचली. त्यानुसार २७ जून रोजी रात्री गुन्हा दाखल करून पीएसआय शब्बीर तांबोळी यांच्याकडे तपास सोपविण्यात आला.
पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड आणि प्रभारी अधिकारी महेश भावीकट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक, एलसीबी, आरपीएफ व तांत्रिक विश्लेषण शाखेने सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपीचा माग काढला.
तपासादरम्यान आरोपी सोलापूरातील नवी पेठेतील एका लॉजमध्ये थांबल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तो राजकोट एक्सप्रेसने मुंबईकडे जाण्याच्या तयारीत असताना सोलापूर रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत आरोपीने आपले नाव राजनकुमार श्रीसिद्धेश्वरकुमार श्रीवास्तव (वय ५७, रा. रातू रोड, रांची, झारखंड) असे सांगितले. त्याच्या अंगझडतीत ९ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि चोरीस गेलेली लेडीज पर्स जप्त करण्यात आली.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता २४ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली असून, या आरोपीकडून आणखी रेल्वे चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता लक्षात घेऊन पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel