सोलापुरातील महापालिकेचे प्रसिद्ध कंत्राटदार सतीश भोसले यांचे गोवा येथे अपघाती निधन…

सोलापूर शहरातील प्रसिद्ध कंत्राटदार सतीश उद्धव भोसले (वय 55, रा. जानकी नगर, जुळे सोलापूर) यांचे सोमवारी गोवा येथे दुर्दैवी अपघाती निधन झाले. ही माहिती त्यांचे मावसभाऊ राहुल शिंदे यांनी दिली.
सतीश भोसले हे सोलापूर महानगरपालिका तसेच पीडब्ल्यूडी विभागातील परिचित कंत्राटदार होते. गंगेवाडी येथे त्यांचा वाळू, मुरूम व बांधकाम साहित्याचा मोठा व्यवसाय होता. मनमिळाऊ, प्रामाणिक, शांत स्वभाव आणि धार्मिक प्रवृत्तीमुळे त्यांनी अनेकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांचा मित्रपरिवारही मोठा होता.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई, भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे.
असा झाला अपघात…
सतीश भोसले हे आपल्या कुटुंबासोबत गोवा येथे पर्यटनासाठी गेले होते. समुद्रकिनाऱ्यावर फिरत असताना अचानक आलेल्या जोरदार लाटेमुळे ते पाण्यात वाहून गेले. पाण्यात बुडाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, अशी माहिती राहुल शिंदे यांनी दिली.
सध्या गोवा येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी त्यांचा मृतदेह ठेवण्यात आला असून पार्थिव सोलापुरात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. मंगळवारी सोलापुरात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
सतीश भोसले यांच्या अकाली निधनाने महापालिका वर्तुळासह मित्रपरिवारात हळहळ व्यक्त होत आहे. एक प्रेमळ, मदतीला धावून जाणारा आणि जिवाभावाचा मित्र हरपल्याची भावना अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.



