सोलापुरात वाढदिवसाच्या पार्टीत राडा, तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला…

घरफोडीच्या उद्देशाने घरात डोकावणाऱ्या संशयितास पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला करून जखमी केल्याची घटना भवानी पेठ परिसरात घडली. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अमित सुभाषचंद्र बिराजदार (रा. गुजर वस्ती, भवानी पेठ, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ जून २०२६ रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गुजर वस्ती परिसरात हा प्रकार घडला.
फिर्यादीनुसार, अमित बिराजदार हे मित्र त्रिलोक व मुकेश यांच्यासोबत मुकेशच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या घरी बसले होते. यावेळी शेजारी राहणारा धीरज सिंगे हा चोरीच्या उद्देशाने बहिणीच्या घरात डोकावत असल्याचे दिसून आले. संशय आल्याने फिर्यादी व त्यांच्या मित्रांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला.
यावेळी आरोपीने चोरी करण्यासाठी आल्याची कबुली दिली. त्यानंतर घरी जाऊन लोखंडी रॉड आणून फिर्यादी अमित बिराजदार यांच्या कपाळावर मारहाण करून दुखापत केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी धीरज सिंगे (रा. भवानी पेठ, सोलापूर) याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११८(१) अन्वये जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.



