सोलापुरात शुक्रवार पेठेतील ‘वैरागकर हाइट्स’वर पाडकाम कारवाई…

सोलापूर शहरात बनावट बांधकाम परवान्यांच्या घोटाळ्यानंतर महापालिका प्रशासन आता पूर्णपणे अॅक्शन मोडमध्ये आले असून अनधिकृत बांधकामांवर धडक पाडकाम मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहरातील विविध भागांमध्ये उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर गाळे, पार्किंगवरील बांधकामे आणि नियमबाह्य मजल्यांवर कारवाई केली जात असून बुधवारी शुक्रवार पेठ परिसरातील वैरागकर हाइट्स या इमारतीतील अनधिकृत गाळ्यांवर महापालिकेने हातोडा चालवला.
महापालिकेत तब्बल 96 बनावट बांधकाम परवान्यांचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात अनेक बांधकामे नियमबाह्य असल्याचे समोर आले असून त्यापैकी 35 बांधकामे कोणत्याही परिस्थितीत नियमित होऊ शकत नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे संबंधित बांधकामांवर टप्प्याटप्प्याने पाडकामाची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
या मोहिमेच्या पहिल्या दिवशी पाचापेठ येथील स्क्वेअर वन बिल्डरने पार्किंगच्या जागेत उभारलेले तीन गाळे ब्रेकरच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले होते. त्याचप्रमाणे मुमताज किल्लेदार यांनी उभारलेले चार अनधिकृत गाळेही पाडण्यात आले. या कारवाईमुळे शहरातील इतर अनधिकृत बांधकामधारकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बुधवारी सकाळपासूनच शुक्रवार पेठ परिसरात महापालिकेचे अधिकारी, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, अभियंते आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वैरागकर हाइट्स इमारतीतील अनधिकृत गाळे हटवण्यासाठी ब्रेकर मशीन आणि जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली. यावेळी जेलरोड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दरम्यान, महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, बनावट परवान्यांच्या आधारे उभारण्यात आलेल्या आणि नियमात बसत नसलेल्या बांधकामांवर पुढील काही दिवसांतही कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. त्यामुळे शहरातील अनेक बांधकाम व्यावसायिक आणि मालकांचे धाबे दणाणले आहेत.



