सोलापूर बातमीपंढरपूर बातमीमहाराष्ट्रराजकीयसोलापूर राजकीय

माण नदीसाठी पाणी सोडा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडू – खासदार प्रणिती शिंदे यांचा इशारा

पंढरपूर-मंगळवेढा सीमेवरील माण नदीकाठच्या गावांसाठी उजनी कालव्यातून दरवर्षी रोटेशननुसार पाणी सोडले जात असताना यंदा मात्र अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा आणि नियोजनशून्य कारभारामुळे पाणी सोडण्यात आले नसल्याचा गंभीर आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला. नागरिक, शेतकरी आणि पशुधनाच्या हितासाठी तात्काळ पाणी सोडण्यात यावे, अन्यथा शेतकऱ्यांसह तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

माण नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा लाभ गुंजेगाव, मारापूर, घरनिकी, मल्लेवाडी, शरदनगर, सिद्धेवाडी, ढवळस, धरणगाव, नेपतगाव, तावशी, गार अकोले, सरकोली, तनाळी, तपकीर शेटफळ, ओझेवाडी, मुडवी आणि शंकरगाव या गावांतील नागरिक, शेतकरी व पशुपालकांना होत असतो. पिण्याच्या पाण्यासह शेती आणि जनावरांसाठी हे पाणी अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र यंदा रोटेशन चुकल्यामुळे या संपूर्ण परिसरात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून नागरिक व शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.

या प्रश्नाबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी खासदार प्रणिती शिंदे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे आपली व्यथा मांडली. या निवेदनाची तात्काळ दखल घेत खासदार शिंदे यांनी पंढरपूर-मंगळवेढा मार्गावरील सिद्धेवाडी पुलाला भेट दिली. यावेळी त्यांनी उजनी कालवा विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेत शेतकरी व ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि तातडीने माण नदीसाठी पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या. संबंधित अधिकाऱ्यांनीही लवकरात लवकर पाणी सोडण्याचे आश्वासन दिले.

यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, “उजनी कालवा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे यंदाचे पाण्याचे रोटेशन चुकले असून हा अधिकाऱ्यांचा गंभीर हलगर्जीपणा आहे. अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातात, मग पाण्याचे योग्य नियोजन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल झाले पाहिजे.

एकीकडे खत-बियाण्यांच्या किमती वाढल्या आहेत, पेट्रोल-डिझेल महाग झाले आहे, डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे आणि दुसरीकडे पाण्याअभावी शेतकरी संकटात सापडला आहे. शासन आणि प्रशासनाला शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत कोणतीही संवेदनशीलता उरलेली दिसत नाही. भर उन्हाळ्यात नागरिक, शेतकरी आणि जनावरे पाण्यासाठी त्रस्त आहेत. त्यामुळे तात्काळ माण नदीसाठी पाणी सोडण्यात यावे. अन्यथा शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल. पाणी मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील.

दरम्यान, खासदार प्रणिती शिंदे यांनी भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता सुभीरवेद्र खांडेकर यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधूनही माण नदीसाठी तात्काळ पाणी सोडण्याची मागणी केली.

यावेळी भीमा कालवा मंडळाचे कार्यकारी अभियंता कथले, उजनी कालवा विभागाचे अभियंते पंडित, हळकुडे तसेच परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel