खासदार प्रणिती शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश; तिलाठी (इंगळगी) रेल्वे गेट वर ओव्हरब्रिज व अंडरपास मंजूर, कामाची प्रत्यक्ष पाहणी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिलाठी (इंगळगी) येथील रेल्वे गेटवर खासदार प्रणिती शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे रेल्वे ओव्हरब्रिज व अंडरपास रस्त्याला मंजुरी मिळाली असून या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या कामाची आज संबंधित अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष जागेवर पाहणी करण्यात आली.
तिलाठी (इंगळगी) येथील रेल्वे गेट हा परिसरातील दहा ते पंधरा गावांतील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. दिवसभरात अनेक वेळा रेल्वे ये-जा होत असल्याने गेट वारंवार बंद ठेवावे लागते. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती, वाहतुकीची कोंडी निर्माण होत होती आणि वेळेचाही मोठा अपव्यय होत होता.
ग्रामस्थांची ही अडचण लक्षात घेऊन खासदार प्रणिती शिंदे यांनी दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी रेल्वे विभागाकडे निवेदन सादर करून तिलाठी (इंगळगी) येथे रेल्वे ओव्हरब्रिज आणि अंडरपास रस्ता करण्याची मागणी केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळत रेल्वे विभागाकडून या कामास मंजुरी देण्यात आली आहे. जवळपास साठ ते सत्तर कोटी रुपयांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून सध्या त्याचे तांत्रिक नकाशे रेल्वे प्राधिकरण आणि राज्य शासनाच्या संबंधित प्राधिकरणाकडील मंजुरीसाठी प्रलंबित आहेत.
आज खासदार प्रणिती शिंदे यांनी तिलाठी (इंगळगी) रेल्वे गेट येथे संबंधित अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष भेट देत जागेची पाहणी केली. यावेळी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसंदर्भातील विविध तांत्रिक बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तांत्रिक नकाशांना लवकरात लवकर मंजुरी घ्यावी आणि कामात कोणताही विलंब होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या स्पष्ट सूचना खासदार प्रणितीताई शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
या रेल्वे ओव्हरब्रिज व अंडरपास प्रकल्पामुळे तिलाठी (इंगळगी) परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार असून परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सुरक्षित, वेगवान आणि सुलभ होण्यास मदत होणार आहे.
यावेळी रेल्वे गती शक्ती विभागाचे मंडल अभियंता आशिष साहू, नॅशनल हायवे विभागाचे कार्यकारी अभियंता अनिस खैरदी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे आदी उपस्थित होते.



