सोलापूर – तुला नांदवणार नाही, बाळही देणार नाही; कोर्टातूनच बाळाला घेऊन जा,” गुन्हा दाखल!

हुंडा-छळाचा धक्कादायक आरोप! विवाहितेचा मानसिक-शारीरिक छळ, बाळही हिरावून घेण्याची धमकी
सोलापूर : घरगुती वादातून विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. “तुला काम करता येत नसेल तर तू बाईचा जन्मच कशाला घेतलास?” अशा शब्दांत अपमान करत मारहाण केल्याचा आरोप विवाहितेने केला आहे. एवढेच नव्हे तर तिच्या बाळाला तिच्या हातातून हिसकावून घेऊन “तुला नांदवणार नाही, बाळही देणार नाही; कोर्टातूनच बाळाला घेऊन जा,” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
फौजदार चावडी पोलीस ठाण्यात स्नेहल निखील मेळमणे (रा. मरीआई चौक, सोलापूर) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, आरोपी निखील (पती), राजेंद्र (सासरे) आणि सीमा (सासू), रा. ओमकारा रेसिडेन्सी, केसरकर पेठ, सातारा यांनी संगनमताने मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा आरोप आहे.
तक्रारीत पुढे असा आरोप करण्यात आला आहे की, पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा मानसिक छळ केला. धमकी देत तिच्याकडून करारनामा करून घेण्यास भाग पाडले, तसेच मारहाण केली. त्यानंतर तिच्या बाळाला तिच्या हातातून हिसकावून घेत बाळाला परत न देण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 85, 115(2), 352, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक कामठी पुढील तपास करीत आहेत.
या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासानंतर स्पष्ट होणार आहे.



